बीड : चौथ्या टप्प्यातील निवडणुकांच्या तोफा आज थंडावल्या आहेत. दरम्यान बीडमध्ये चौथ्या टप्प्यात निवडणूक होणारा असून महायुतीच्या उमेदवार भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनावणे असा सामना रंगणार आहे. दरम्यान प्रचार संपता संपता बजरंग सोनवणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर जहरी टीका केली आहे.
नेमकं काय घडलं
बीडमध्ये महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार उदयनराजे भोसले हे उपस्थित होते. यावेळीउपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, ” पंकजाताईच्या विरोधात बजरंग उभा आहे. तो सारखा माझ्याकडे यायचा. माझ्या कारखान्याची कॅपसिटी वाढवून द्या, अशी मागणी करायचा. मी देत नव्हतो पण धनंजय मुंडेंनी वाढवून द्यायला सांगितली. मी धनंजय मुंडे यांना सांगितलं होतं की वेसन हातात ठेवायला पाहिजे होते. धनुभाऊला कधी माणसं कळत नाही, म्हणून त्याची गाडी बिघडते,तू माझा सल्ला घेत जा, असे अजित पवारांनी म्हटले होते. तसेच, बजरंग सोनवणेला पंचायत समितीमध्ये स्वत:ची मुलगी निवडून आणता आली नाही,” अशी जहरी टीका अजित पवारांनी बजरंग सोनावणे यांच्यावर केली होती.
दरम्यान यावर बजरंग सोनावणे यांनी देखील अजित पवार यांना कडाडून प्रतिउत्तर दिला आहे. ते म्हणाले की, ” अजित दादांनी धनंजय मुंडेंच्या सांगण्यावरुन मला लोन दिलं असं भाषणात सांगितलं. मग, त्यांच्याच कारखान्याला अजितदादांनी का लोन दिलं नाही, असा प्रश्न सोनवणेंनी उपस्थित केला. तसेच, माझ्या मुलीला पराजित करण्याचं काम धनंजय मुंडे यांनीच केल्याचही ते म्हणाले. तर, लोकसभा निवडणुकीमध्ये अजित दादांना स्वतःचा मुलगा निवडून आणता आला नाही. आमचं माप काढू नका, तुमचं माप बीड जिल्ह्यातील जनता काढल्याशिवाय राहणार नाही,” असे रोखठोक प्रतिउत्तर बजरंग सोनावणे यांनी दिले आहे.