मुंबई : महाराष्ट्राने गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये राजकारणात एवढी उलथापालथ पाहिली आहे की आता अजून नवं काय ? असाच प्रश्न मराठी माणूस करत आहे. कोणता पक्ष कोणत्या पक्षासोबत एक होईल, कोणता नेता केव्हा कोणाच्या सोबत किंवा विरोधात जाईल हे आजच्या महाराष्ट्रातील सुरू असलेल्या राजकारणात स्पष्टपणे म्हणणं अशक्य आहे. आज एक अशीच घटना घडली, महाराष्ट्राच्या राजकारणातील एक असा पक्ष ज्याने मराठी माणसाला स्वतःची ओळख मिळवून देण्यासाठी नेहमीच धडपड केली तो म्हणजे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना…. ! छत्रपती शिवरायांनी जसे आपले मावळे एकत्र बांधून ठेवण्यामध्ये यश मिळवले आणि प्रत्येक मावळ्याच्या कर्तृत्वाने आणि शिवरायांच्या पराक्रमाने हे स्वराज्य उभे राहिले. अशाच या महाराष्ट्राच्या पावन भूमीमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने देखील एकेकाळी धडाका लावला होता. पण शिवसेना फुटली…, त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र उद्धव ठाकरे आणि पुतण्या राज ठाकरे हे सोबत दिसलेच नाहीत. राजकारणानं या दोन्हीही भावंडांमध्ये दुरावा आणला. पण आज रक्तानं… अर्थात त्यांच्या घरच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने का होईना दोन्हीही भावंड एकत्र आल्याचं पाहायला मिळाले.
हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. गेल्या कित्येक वर्षात या दोन्हीही ठाकरे भावांना कोणीही एकत्र पाहिलं नव्हतं. एकमेकांवर टीकाटिप्पणी करणारे हे भावंड कुटुंबासहित आज भाच्याच्या साखरपुड्यामध्ये एकत्र आले होते. राज ठाकरे यांची बहीण जयवंती देशपांडे यांच्या मुलाचा आज साखरपुडा होता. त्या निमित्ताने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सहकुटुंब दादरमध्ये या कौटुंबिक कार्यक्रमात एकत्र भेटले आहेत.
साखरपुड्याच्या या सोहळ्यामध्ये दोन्ही कुटुंबांनी राजकारण बाजूला ठेवून एकमेकांची विचारपूस केली. तसेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी देखील एकमेकांची विचारपूस केली आहे. या फोटो प्रमाणे ठाकरे भावंडं भविष्यात राजकारणात एकत्र येतील का ? तुमचा मत नक्की कळवा !