बीड : लोकसभा निवडणूक 2024 चा निकाल हा अत्यंत धक्कादायक मानला जातो आहे. 2014, 2019 या दोन्ही पंचवार्षिकमध्ये मोदी लाटेन राज्यसह देशाला अक्षरशः झोडपून काढलं होतं. हार काय असते हे भाजपच्या अनेक नेत्यांनी पाहणं जणूकाही ते विसरलेच होते. अशातच महाराष्ट्र आणि देशभरात जो या लोकसभा निवडणुकीत भाजपला फटका बसला आहे त्याबाबत अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.
एकंदरीतच या पराभवातून भाजपला आता पुन्हा एकदा आत्मपरीक्षण करणं महत्त्वाचं झालं आहे. अशातच निश्चित मानले जात असणारी बीडची जागा जी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या लढवत होत्या ती देखील भाजपच्या हातातून गेल्यानंतर अनेकांनी भवया उंचावल्या आहेत.
ही हार पचवणं खरंतर स्वतः पंकजा मुंडे यांना देखील कठीण जाते आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना पंकजा मुंडे यांनी आपल्या मनातली खदखद स्पष्ट शब्दात व्यक्त केली त्या म्हणाल्या की, ” माझ्या आयुष्यातील सर्वात विचित्र वेगळी अशी ही निवडणूक होती. मी जेव्हा मतमोजणी केंद्राच्या बाहेर आले तेव्हा समोरील जमाव फारच आक्रमक होता. माझ्या आयुष्यात पहिल्यांदा माझ्या जमावानं कारच्या काचांना बुक्क्या मारल्या. मी विजय, पराभव सगळं पाहिलेलं आहे. पण बीड जिल्ह्यात मी असं कधी पाहिलं नाही. हेच थोडं अस्वस्थ करणार आहे ! ” अशा शब्दात त्यांनी मनातील खंत व्यक्त केली.
बीड जिल्ह्यामध्ये महायुतीच्या वतीने पंकजा मुंडे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे आणि वंचित बहुजन आघाडीचे अशोक हिंगे यांचे आव्हान होते. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांनी 6653 मतांनी पंकजा मुंडे यांचा पराभव करून जयंत किलर सिद्ध झाले आहेत.