Namdev Jadhav : मराठा आरक्षणावरुन शरद पवारांवर टीका करणाऱ्या पुण्यातले प्राध्यापक नामदेव जाधव (Namdev Jadhav) यांना काळं फासण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी हे कृत्य केलं आहे. नामदेव जाधव हे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना त्यांचावर काळं फासत निषेध नोंदवला. नामदेव जाधव यांनी शरद पवारांविरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी काळं फासण्यात आलं. पवारांवर वारंवार टीका केल्यामुळेच हे कृत्य केल्याचं या कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे. भांडारकर इन्स्टिट्यूट इथं कार्यक्रमासाठी जाताना त्यांच्यावर हा प्रसंग ओढवल्याचं सांगितलं जात आहे. (Namdev Jadhav ncp activist attack namdeo jadhav over statement)
शरद पवार यांच्या जात प्रमाणपत्रावर कुणबी नोंद असल्याचा दावा नामदेव जाधव यांनी केला होता. तसंच शरद पवार यांच्याविरोधात वक्तव्य केलं होतं. याविरोधात आक्रमक होत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना नामदेव जाधव यांना गाठलं आणि काळं फासत घोषणा दिल्या.
आणखी वाचा – Akshay Kumar vs Vikrant Massey : ’12th Fail’ या चित्रपटासमोर अक्षय कुमारचा चित्रपट Fail
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून विरोध झाल्यानंतर नामदेव जाधव यांचा कार्यक्रम रद्द करण्यात आला. यानंतर पुण्याच्या पत्रकार भवनबाहेर ते प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देत होते. “लोकशाहीत विचार मांडण्याचा अधिकार आहे. कार्यक्रमाला परवानगी नाकारल्याने आपण पाकिस्तान, अफगाणिस्तानमध्ये राहतो का असा प्रश्न निर्माण होतो. मी पोलिसांकडे विचारणा करणार आहे. जर मी पुरावे घेऊन बोलतोय तर तुम्ही पण तसेच बोलले पाहिजे. विचारांची लढाई आहे विचाराने लढली पाहिजे,” असं यावेळी त्यांनी सांगितलं.
दरम्यान ते बोलत असतानाच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळं फासलं. यावेळी काहींनी त्यांच्यावर हातही उचलला. यावेळी सुरक्षेसाठी तैनात पोलीस कर्मचाऱ्याने त्यांना कार्यकर्त्यांपासून वाचवलं आणि गाडीत बसवलं.