मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार यावरून सध्या राजकीय अंतर्गत वातावरण ढवळलं गेल आहे. यामुळे पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत. दरम्यान काँग्रेसकडे शिवसेना उद्धव ठाकरे गटाने 23 जागांची मागणी केली आहे. खासदार संजय राऊत यांनी या मागणीचे पत्रक पाठवले आहे. दरम्यान या जागावाटप प्रश्नावरून शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वादविवाद सुरू असतानाच नितेश राणे यांनी देखील मध्ये उडी घेतली आहे. ” कोणीही काँग्रेसचे गल्लीतले नेते यांना टपल्या मारायला लागले, ही यांची लायकी आहे.” अशा थेट भाषेत नितेश राणे यांनी खासदार संजय राऊत यांना टोला लगावला आहे.
काय म्हणाले नितेश राणे ?
उद्धव ठाकरे गटाच्या 23 जागांच्या मागणी संदर्भात पत्रकारांची बोलताना नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर घणाघाती टीका केली आहे ते म्हणाले की, भाजपबरोबर यांची युती होती तेव्हा अमित शहा स्वतः मातोश्रीवर आले होते. मुख्यमंत्री असूनही देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करायचे. उद्धव ठाकरे तेव्हा मध्येच उठून जायचे आणि आदित्य आणि वरूण सरदेसाईला चर्चेला बसायचे, कधी कधी तो श्रीधर पाटणकर देखील येऊन चर्चेला बसायचे. आता ना सोनिया गांधी भेटत ना राहुल गांधी भेटत, खर्गे पण यांना वेळ देतील का? हा फार मोठा प्रश्न चिन्ह आहे.
काँग्रेसने यांच्याकडे ढुंकून देखील बघितले नाही. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला काँग्रेस पक्ष पाच जागेपेक्षा जास्त जागा देत नाही अशी माझी माहिती आहे. जे दुपारचे सामनाचे पहिले संपादक होते ते पण आजकाल यांची लायकी काढू लागलेत की यांच्याकडे 23 माणसे नाहीत.
संजय राऊतचे संरक्षण काढा आणि याला हिंदूंच्या हवाले करा
22 तारखेचा अयोध्येचा कार्यक्रम मंदिर समितीने असंख्य साधू संतांनी एकत्र बसून त्या पवित्र ठिकाणी कोणी जावं, कुणी पूजा अर्चा करावी, कोणी रामाचे दर्शन घ्यावे हे समितीने ठरवले आहे. त्याला भाजपचा कार्यक्रम म्हणून परत एकदा संजय राऊतने आपल्या मालकाची हिंदू द्वेषी भूमिका दाखवली आहे. तू जर वारंवार आमच्या हिंदू समाजाचा अपमान केला तर मी महाराष्ट्र सरकारला सांगेन असलेले त्याचे संरक्षण काढा आणि याला हिंदूंच्या हवाले करा. हा परत याच्या दोन पायावर घरी जाणार नाही याची काळजी हिंदू समाज आणि कार्यकर्ते निश्चितपणे घेतील.