पुणे : पुण्यामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण कमी होत नाहीये. पण प्रत्येक वेळी सर्वस्वी पोलीस प्रशासनच जबाबदार असते असे नाही. गुन्हेगारांची मानसिकता , जडणघडण ही देखील कारणीभूत ठरते. पुण्यात अशा अनेक गुन्हेगारांच्या टोळक्या आहेत. जे सातत्याने शहराचं वातावरण खराब करत असतात. नुकतीच वडगाव शेरी परिसरातून एक घटना समोर येते आहे. वडगाव शेरीमध्ये रात्री अकरा वाजता एका टोळक्याचा धुडगूस सुरू होता. या टोळक्यातील काही जणांकडे कोयते आणि लाकडी दांडके देखील होते. तसेच हे सर्वजण एकमेकांवर दगड विटांनी देखील हल्ला करत होते असे समजते आहे.
विशेष असे की यावेळी चंदननगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या हवालदार सीमा वळवी या आपली ड्युटी संपवून घरी परतत असताना त्यांनी हा सर्व प्रकार पाहिला आणि क्षणाचाही विलंब न करता त्यांनी या टोळक्याला आपल्या कणखर आवाजात दरडावले. त्यानंतर काहीजण पळून गेले. तर सर्वांना पकडण्यात सीमा वळवी या गुंतलेल्या असताना काही जणांनी एकमेकांवर कोयत्याने देखील वार केले असल्याचे समजते आहे. अशा बिकट प्रसंगी देखील वळवी यांनी एका हाताने आरोपींचे चित्रीकरण देखील सुरू ठेवले. यावेळी वळवी यांनी एका आरोपीला जखडून ठेवले आणि त्यानंतर काही वेळातच पोलीस या ठिकाणी दाखल झाले.
भर रहदारीच्या ठिकाणी हे समाजकंटक वातावरण खराब करत होते. अशावेळी दुर्गेचा अवतार घेऊन सीमा वळवी या तिथे आल्या, यावेळी त्यांनी फक्त या समाजकंटकांनाच थाऱ्यावर आणले नाही तर एक स्त्री असून या सर्व गुंडांना त्या पळवू शकतात पण आजूबाजूला उभे असणारे सर्वजण केवळ बघ्याची भूमिका घेतात हे देखील समाजाच्या अहिताचे लक्षण आहे. परंतु लेडी सिंघम बनलेल्या सीमा वळवी यांच्या मात्र कर्तृत्वाचे कौतुक झालेच पाहिजे.