पुणे : वसंत मोरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी आता ते कोणत्या पक्षा सोबत जाणार हा सर्वात महत्त्वाचा विषय होता. दरम्यान लोकसभेसाठी महाविकास आघाडी कडून आमदार रवींद्र धंगेकर यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे आता लोकसभा लढवण्यासाठी वसंत मोरे यांनी देखील निवडणूक लढवणारच असा निर्धार केला आहे.
वसंत मोरे हे म्हणाले की, ” मी लोकसभा लढवणारच पुण्याची निवडणूक एकतर्फी होणार नाही. मुंगी कितीही लहान असली तरी हत्तीचा चावा घेऊ शकते.” असं ते म्हणाले आहेत. ” अनेक मुद्दे घेऊन मी पुणेकरांसमोर जाणार आणि सभेतून मुद्दे मांडणार आहे. मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर झाल्यावर अनेक भाजप नेते बोलले की, ही निवडणूक एकतर्फी करू… पुणेकर कधीच कुणाला एकतर्फी निवडून देत नाहीत. रवींद्र धंगेकर यांना शुभेच्छा ! त्यांच्या पक्षाने त्यांना तिकीट दिलं तर ते आमदारकीवरून खासदारकी लढवतील. तर मी अजूनही लोकसभेच्या रिंगणात आहेत असं वसंत मोरे म्हणाले आहेत.
लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर महायुतीकडून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेस कडून उमेदवारी रवींद्र धंगेकर यांना मिळणार असल्याची जोरदार चर्चा आहे. ही उमेदवारी आपल्याला मिळावी अशी अपेक्षा वसंत मोरे यांना होती. त्यांनी महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी देखील घेतल्या होत्या. दरम्यान आता वसंत मोरे यांनी ही निवडणूक लढवायचीच असा निर्धार केला आहे. त्यामुळे पुण्यातील राजकारणातील या तिहेरी निवडणुकीत काय होते हे लवकरच समजेल.