पुणे : Lok Sabha Elections 2024 : वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्रपणे निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आज पुण्यातून आणखीन एक मोठी बातमी समोर येते मनसेला सोडचिठ्ठी दिलेले वसंत मोरे यांनी सुरुवातीला महाविकास आघाडी कडून उमेदवारी मिळावी म्हणून बरेच प्रयत्न केले. पण अखेर महाविकास आघाडीने रवींद्र धंगेकरांनाच उमेदवारी जाहीर केली. तर आज आता वसंत मोरे हे राजगृहावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत.
यंदाची लोकसभा निवडणूक लढवणारच असा ठाम निर्धार केलेले वसंत मोरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर महाविकास आघाडी कडून आपल्याला संधी मिळावी यासाठी थेट शरद पवार, संजय राऊत या बड्या नेत्यांसह पुण्यामध्ये रवींद्र धंगेकरांची देखील भेट घेतली होती. त्यानंतर काँग्रेसने रवींद्र धंगेकरांना उमेदवारी घोषित केली. यानंतर वसंत मोरे यांनी मराठा समाजाच्या बैठकीत देखील हजेरी लावली होती. पण इथेही बिनसलं गेलं आणि आज आता ते वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीसाठी राजगृहावर दाखल झाले आहेत.
आजच्या या बैठकीमध्ये वसंत मोरे हे प्रकाश आंबेडकरांना लोकसभेसाठीच्या उमेदवारी मिळण्याबाबत चर्चा करणार अशी दाट शक्यता आहे. या बैठकीनंतरच नेमकी चर्चा काय झाली आणि वसंत मोरे यांची आता तरी इच्छा पूर्ण होते का ? हे लवकरच समजेल. परंतु कोणाकडूनही उमेदवारी मिळाली नाही तरीही ही निवडणूक लढवणारचं असा निर्धार वसंत मोरे यांनी केला आहे. त्यामुळे पुण्याची लढत ही तिहेरी होणार यात शंका नाही.