मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या Lok Sabha Elections पार्श्वभूमीवर महायुतीतील जागा वाटपाबाबतचे बरेचसे तिढे सुटले आहेत. परंतु अद्याप नाशिक सह मुंबईतील दोन जागांचा तिढा सुटलेला नाही. तर आता भाजप उत्तर मध्य मुंबईसाठी प्रसिद्ध वकील उज्वल निकम Ujjwal Nikam यांच्या नावाची चाचपणी करत असल्याची माहिती समोर येते आहे.
मुंबईतील लोकसभेसाठी सहा जागा आहेत. या सर्व जागा जिंकण्यासाठी भाजपने प्रचंड तगडी मोर्चे बांधणी केली आहे. या सहा जागांपैकी दोन जागांसाठी तिढा सुटलेला नाही. यामध्ये उत्तर मध्य मुंबईची जागा नेमकी कोणाला मिळणार अशा चर्चेला उधाण आले असताना सुरुवातीला प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित हिला भाजप विचारणा केली होती. परंतु माधुरी दीक्षितने निवडणूक लढवण्यासाठी नकार दिला. त्यानंतर आशिष शेलार यांच्या नावाची देखील चर्चा सुरू होती. परंतु आशिष शेलार हे देखील उत्सुक नसल्याने आणि ही जागा कोणत्याही परिस्थितीत जिंकायचीच या निर्धाराने या जागेवर प्रसिद्ध चेहरा द्यायचा असा घाट भाजपने घातला आहे.
भाजपच्या गोटात उज्वल निकम यांच्या नावाची कुजबुज सुरू आहे. तसेच त्यांच्या नावाची चाचपणी देखील सुरू असल्याचे समजत आहे. उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या सध्या पूनम महाजन या खासदार आहेत. परंतु यावेळी या जागेवरून आता उज्वल निकम यांना उमेदवारी मिळणार का ? हे काही वेळातच स्पष्ट होऊ शकेल. परंतु स्वतः उज्वल निकम यांनी याबाबत कोणतही भाष्य केलेलं नाही.