मुंबई : सध्या लोकसभा निवडणुकीच्या Lok Sabha Election पार्श्वभूमीवर खरंतर सर्वच नेते एकमेकांवर टीकाटिप्पणी करत आहेत. राजकारण म्हटलं कि एकमेकांच्या कामावर बोट उचलणं म्हणजे सरळ मार्गे केलं जाणार राजकारण असं सामान्य मतदाराला तरी वाटत असावं. पण आज काल एकमेकांचं चारित्र्य, कुटुंबातील अंतर्गत कलह यांवरच नेमकं बोट ठेवले जाते आणि अक्षरशः अर्वाच्च भाषेत बोलले जाते.
महाराष्ट्रातील महिला नेत्यांमध्ये अशीच जुंपली आहे. याला कारणं ठरली आहे ती म्हणजे प्रज्वल रेवन्ना आणि जाहिरातीमध्ये पॉर्नस्टारला दिलं गेलेलं पात्र !
तर झालं असं की, भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी शिवसेनेच्या एका जाहिरातीचा उल्लेख करत असताना थेट शब्दात टीका केली आहे. माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या कि, ” महिला अत्याचाराच्या संबंधी प्रसिद्ध केलेल्या या जाहिरातीमधील कलाकार हा पॉर्न स्टार आहे. उल्लू अॅपमधील वेब सीरिजमध्ये त्याने काम केले असून त्यात महिलांचे शोषण करतो. मग, अशा कलाकाराला घेऊन त्यांनी महिला अत्याचारावर जाहिरात कशी केली, असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे. “
चित्रा वाघ यांनी पेटवलेल्या या वणव्यामध्ये आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उडी घेतली आहे. यावेळी सुषमा अंधारे यांनी आपल्या एक्स अकाउंटवर एक पोस्ट शेअर करून लिहिले आहे की, ” आक्रस्ताळ्याबाई सवयीप्रमाणे बडबडून गेल्या. पण 3000 हून जास्त सेक्स व्हिडिओ व्हायरल झालेल्या प्रज्वल रेवण्णा, किंवा मुलुंडच्या HD व्हिडिओ वाल्याबद्दल त्या अळीमिळी चुपचीळी करून बसल्या. त्यांची काही चूक नाही, सध्या त्या दिल्या भाकरीच्या आणि सांगितल्या चाकरीच्या आहेत, ” अशा शब्दत सुषमा अंधारे यांनी टीका केली आहे.
त्याचबरोबर खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी देखील चित्रा वाघ यांच्यावर सनित टीका केली आहे. त्यांनी थेट तुम्ही पॉर्नस्टार उमेदवार उभा केला आहे असा आरोप केला. माध्यमांशी बोलताना प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या की, ” जो पॉर्न उमेदवार तुम्ही उभा केला, ज्याने हजारो महिलांचं शोषण केलं, घरात काम करणाऱ्या महिलांनाही ज्यांनी सोडलं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींना तुम्ही याबाबत का विचारत नाहीत. मोदींनी प्रज्वल रेवण्णाच्या बाबातीत का विधान केलं नाही. 2500 पेक्षा जास्त व्हिडिओ क्लीप समोर आले आहेत, जो भाजपासोबत येऊन ही लढाई लढत आहे, त्याच व्यक्तीकडून हे व्हिडिओ मिळाले आहेत. त्याला पळवून लावण्याचं काम तुम्ही केलंय, तो फ्रान्समध्ये मजा मारत फिरतोय आणि तुम्ही आम्हाला प्रश्न विचारत आहात. जरा तरी लाज वाटू द्या, पाण्यात बुडून मरा… !” अशी घणाघाती टीका प्रियांका चतुर्वेदी यांनी केली आहे.