अहमदनगर : अहमदनगरमधून Lok Sabha Election एक मोठी बातमी समोर येते आहे. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके विरुद्ध महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांच्यामध्ये लढत होणार आहे. दरम्यान आज पारनेरचे माजी आमदार विजय औटी यांनी थेट महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
पारनेरचे आमदार विजय औटी यांनी देखील आजपर्यंत चांगले काम केले आहे. पारनेरमध्ये त्यांना मानणारा मोठा वर्ग देखील आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर सुरुवातीला विजय औटी यांनी तटस्थ भूमिका घेतली होती. परंतु आता त्यांनी थेट महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांना आपला पाठिंबा जाहीर केल्याने निलेश लंके यांना आपल्याच बालेकिल्ल्यातून मोठ्या विरोधाला सामोरे जावं लागणार आहे.
खरंतर अहमदनगरमध्ये सुजय विखे पाटील यांचं मोठं आव्हान निलेश लंके यांना आहे. निलेश लंके यांचं पारनेर भागामध्ये मोठं काम आहे. त्यांना आता अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या इतर भागांमध्ये आपले वर्चस्व वाढवण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत. सुजय विखे पाटील हे विद्यमान खासदार आहेत. परंतु अहमदनगरमधील शेतकरी वर्ग हा सुजय विखे पाटील यांच्यावर नाराज आहे. त्यामुळे ही निवडणूक तगडी होणार यात शंका नाही.
काय म्हणाले माजी आमदार विजय औटी
सुरुवातीला माजी आमदार विजय आवटी यांनी आपली भूमिका तटस्थ ठेवली होती. परंतु त्यांनी आता थेट आपला पाठिंबा महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांना जाहीर केला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, ” तालुक्यातील आमचे कार्यकर्ते रामदास भोसले, श्रीकांत पठारे, अनिल शेटे आणि प्रियंका खिलारी यांनी एकत्रित निर्णय घेतला आहे. सुजय विखेंना पाठींबा देताना आम्ही दोन्ही उमेदवारांचे विचार, कामाची पद्धत आणि अनुभवाचा विचार केला आहे. विखे पाटील यांनी पाच वर्षे चांगलं काम केलंय. सुजय विखेंना आणखी पाच वर्षे संधी मिळाली, तर ते चांगले काम करू शकतात. एक अनुभव समृद्ध खासदार या भागाला मिळू शकेल. प्रचारात महाविकास आघाडीकडून देशाच्या संरक्षणासह इतर महत्त्वाचे विषय मांडले जात नाहीत. स्थानिक मुद्द्यांना अवास्तव महत्व दिले जात आहे. महाविकास आघाडीचे घटक पक्ष असूनही आपल्याला विश्वासात घेतले जात नाही. विखेंनी गेल्या पाच वर्षांत चांगले काम केले आहे. त्यामुळे त्यांना पाठिंबा देत असल्याचे औटी यांनी स्पष्ट केले आहे.