मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी Former Chief Minister Manohar Joshi यांचे निधन झाले आहे. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयामध्ये वयाच्या 87 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 22 फेब्रुवारीला त्यांना अत्यवस्थ वाटू लागल्याने मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. यावेळी हृदयविकाराच्या झटक्याचे निदान झाल्यानंतर त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते.
मनोहर जोशी यांना एक मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे. दोन वेळा नगरसेवक पद, तीन वेळा विधानपरिषद सदस्य, मुंबई महापालिका महापौर, दोन वेळा विधानसभा सदस्य, विरोधी पक्ष नेता विधानसभा म्हणून एक वर्ष कामगिरी, तर 1995 ते 1999 दरम्यान ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते.
त्यानंतर त्यांनी अवजड आणि सार्वजनिक उद्योग केंद्रीय मंत्री म्हणून पद भूषवले, त्यानंतर लोकसभा अध्यक्ष आणि 2002 ते 2004 दरम्यान ते राज्यसभा खासदार होते. बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे मनोहर जोशी यांनी पंधरा पुस्तके लिहिली आहेत. आजपर्यंतचा त्यांचा राजकीय प्रवास अत्यंत मोठा आणि आजच्या पिढीला आदर्शवत आहे.
अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव माटुंगा पश्चिम, रुपारेल कॉलेज जवळील W54 या त्यांच्या सद्याच्या निवासस्थानी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळात ठेण्यात येणार आहे. दुपारी 2 नंतर अंत्ययात्रा सुरू होईल. दादर स्मशान भूमीत शासकीय इतमामात अंत्य संस्कार करण्यात येणार आहे.