मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील राष्ट्रपती राजवट आणि 2019 मधील पहाटेचा शपथविधी यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर घणाघाती आरोप केले होते. यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांच्या आरोपावर प्रतिहल्ला केला आहे. यावेळी संजय राऊत म्हणाले की, ज्या सिंचन घोटाळ्यातील आरोपींना हे चक्की पिसायला तुरुंगात टाकायला निघाले होते, ते आज देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूला बसले आहेत. अशी टीका त्यांनी केली.
यावेळी संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस स्वतःच स्वतःचा अपमान करत आहेत. दिल्लीने फडणवीस ज्या पद्धतीने मातेरे आणि पोतेरे केलं आहे त्याची आम्हाला लाज वाटते. आम्हाला फडणवीसांची दया येते. एकनाथ शिंदे हे बेकायदेशीर मुख्यमंत्री आहेत. सर्वोच्च न्यायालयाने आणि विधिमंडळ अध्यक्ष यांनी कायद्याने वागायचं असं मनात आणलं तर एकनाथ शिंदे पाच मिनिटे ही मुख्यमंत्रीपदावर राहू शकत नाही, अशी टीका देखील राऊत यांनी केली आहे.
तसेच देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांना पाच वर्षे मुख्यमंत्री ठेवणार असे सांगत आहेत. त्यांनी शिंदेंना बेकायदेशीरपणे त्या पदावर बसवल आहे. अजित पवारांची आमदारकी जाणार असून जर ते कायद्याने घटनेनुसार वागणार असतील तर, 2024 नंतर अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्याबरोबर देवेंद्र फडणवीस यांना देखील मोठा राजकीय धक्का बसणार आहे. असा दावा देखील संजय राऊत यांनी केला आहे.