बारामती : आज बारामतीमध्ये हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतोय. आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे या थेट अजित पवारांच्या बंगल्यावर जाऊन पोहोचल्या. बंगल्यावर त्या त्यांच्या काकी अर्थात अजित पवारांच्या आई यांना भेटण्यासाठी गेल्या होत्या असं त्यांनी सांगितलं. आणि आता मतदानाला पोहोचल्यावर अजित पवार म्हणतात ” मेरे पास मेरी मा है, मेरी मा मेरे साथ है ” अर्थात ही टिप्पणी त्यांच्या सख्ख्या भावावर अधिक होती. असाच रोख त्यांच्या बोलण्यातून जाणवला.
आज उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या पत्नी आणि महायुतीच्या अधिकृत उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासह आपल्या आईसोबत मतदानासाठी पोहोचले होते. यावेळी माध्यमांनी त्यांना हटकले असता ते म्हणाले की, ” पवार कुटुंबात सगळ्यात मोठी माझी आई आहे. माझी आई माझ्यासोबत आहे. बाकीच्यांचा काय विचार करताय ? मेरी मा मेरे साथ है ! अशी डायलॉग बाजी यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली आहे.
बारामतीत हायव्होल्टेज ड्रामा : सुप्रिया सुळे पोहोचल्या अजित पवारांच्या बंगल्यावर, राजकीय वर्तुळात खळबळ
दरम्यान बारामतीमध्ये अजित पवारांवर पैसे वाटल्याचा देखील आरोप झाला होता. यावर अजित पवार म्हणाले की, हा खोटा आरोप आहे. त्यांनी पैसे वाटले असतील मी असले धंदे केले नाहीत. निवडणूक आयोगाने चौकशी करावी असे थेट आव्हानच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी निवडणूक आयोगाला दिले.
या निवडणुकीमध्ये पवार कुटुंब पूर्णपणे विभागले गेले. हि आता प्रतिष्ठेची निवडणूक आज लढली जाते आहे. सख्या भावाने जरी साथ सोडली असली तरी आई सोबत असल्याच अजित पवारांना हायसं वाटलं आहे. अर्थात आता कौटुंबिक वादविवाद हे आयुष्यभर सुरू राहत असतात. पण राजकीय वादावर येत्या 4 जून रोजी पडदा पडेलच.