Cash-for-query case : तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांना लोकसभेच्या एथिक्स कमिटीने २ नोव्हेंबररोजी हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. यापूर्वी महुआ यांना समितीने ३१ ऑक्टोबर रोजी समन्स बजावले होते, मात्र त्यांनी व्यस्त वेळापत्रकाचे कारण देत हजर राहण्यासाठी आणखी वेळ मागितला होता.
मोइत्रा यांनी शुक्रवारी ‘एक्स’ वर लिहिले की, “मी साक्ष देण्यास उत्सुक आहे, परंतु माझ्या मतदारसंघात पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे मी 4 नोव्हेंबरपर्यंत व्यस्त आहे. त्यामुळे मी समितीसमोर हजर राहू शकत नाही.
26 ऑक्टोबर रोजी वकील आणि भाजप खासदाराचा जबाब नोंदवण्यात आला.
कॅश फॉर क्वेरी प्रकरणात लोकसभेच्या एथिक्स कमिटीने गुरुवारी (२६ ऑक्टोबर) वकील जय आनंद देहाडराय आणि भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांचे जबाब नोंदवले होते. यावेळी दुबे यांनी महुआ मोइत्रा यांची तात्काळ हकालपट्टी करण्याची मागणी केली.
टीएमसी खासदार महुआ मोइत्रा यांच्यावर काय आरोप आहेत?
तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांच्यावर भेटवस्तू आणि पैशांच्या बदल्यात संसदेत प्रश्न विचारल्याचा आरोप आहे. भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून महुआ यांच्यावर पैसे घेतल्याचा आरोप करत एका व्यापाऱ्याच्या हिताशी संबंधित प्रश्न विचारले आहेत. यामुळे आता महुआ यांच्या संसद सदस्यत्वाला धोका निर्माण झाला आहे.









