मुंबई : आजची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कथित गैरव्यवहार प्रकरणी मुंबईसह सहा ठिकाणी बारामती अॅग्रो कंपनीशी संबंधित ठिकाणांवर अंबलबजावणी संचालयाने छापेमारी केली आहे. आज सकाळी ईडीने पुणे, बारामती आणि इतर ठिकाणी छापेमारी केल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षी रोहित पवार यांना याबाबत नोटीस पाठवण्यात आली होती. अशातच आता त्यांच्या कंपनीवर छापेमारी करण्यात आली आहे.

बारामती अॅग्रोवर केंद्रीय तपास यंत्रणेने धाड टाकल्याची माहिती समोर आल्याने राजकारणात खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र शिखर बँक घोटाळा प्रकरणी ईडीने बारामती अॅग्रोवर आज छापा टाकलाय. पुण्यातील हडपसर येथील बारामती अॅग्रोच्या कार्यालयातदेखील ईडीने छापा टाकला आहे. बारामतीमधील पिंपळे येथे बारामती अॅग्रोचं कार्यालय आहे. तिथे ईडीची धाड पडली असून रोहित पवार यांचा छत्रपती संभाजीनगर येथे एक कारखाना आहे या कारख्यान्यांमध्ये देखील ईडीने धाड टाकली आहे.
याबाबत स्वतः आमदार रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट करून म्हंटले आहे कि, “हा आहे स्वाभिमानी महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांचा चेहरा.ज्यांनी पिढ्यान् पिढ्या महाराष्ट्र धर्म जपला आणि वाढवला. अन्यायाविरोधात प्रसंगी संघर्ष करण्याची शिकवणही या महान विभूतींनी दिल्याने महाराष्ट्र भूमीला संघर्षाचाही प्रदीर्घ इतिहास आहे. म्हणून मराठी माणूस या नात्याने महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी आणि टिकवण्यासाठी प्रत्येकाला संघर्षाचीही तयारी ठेवावी लागेल…”
दरम्यान किरीट सोमय्या यांनी देखील रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
आपल्या एक्स अकाउंटवर त्यांनी पोस्ट केले होते कि, “मी पुन्हा एकदा तपास यंत्रणांना रोहित पवार यांच्याविरोधात सखोल तपास करण्याची विनंती करतो. कोट्यवधी रुपयांचा कन्नड सहकारी साखर कारखाना बारामती अॅग्रोने अवघ्या 50 कोटी रुपयांत विकत घेतला होता”, असं किरीट सोमय्या यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे.