मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणामध्ये मोठमोठ्या हालचाली रोजच होत आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वी मनसे प्रमुख राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यानंतर लोकसभा निवडणूक राज ठाकरे आता महायुती सोबत लढणार का? कशा चर्चेला उधाण आले होते. परंतु काही दिवस त्या हालचाली वेगवान झाल्या आणि आता पुन्हा थंडावल्या आहेत.
दरम्यान आज बऱ्याच दिवसानंतर शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी शिवतीर्थवर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. या दोघांमध्ये सुमारे एक तास चर्चा झाली. ही चर्चा राजकीय असल्याचं बोललं जात आहे. परंतु या चर्चेमध्ये युतीत सामील होण्याबाबत काही चर्चा झाली का ? यावर मात्र माहिती मिळू शकली नाही.
या भेटीनंतर आमदार संजय शिरसाठ यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले आहे की, ” राज ठाकरेंचे आणि आमचे वेगळे संबंध आहेत. शिवसेनाप्रमुखांच्या मराठवाड्यात जेव्हा सभा व्हायच्या त्यावेळी राज ठाकरे आवर्जून बाळासाहेबांच्या सोबत असायचे शिवसेनाप्रमुख म्हणायचे मनभेद नसायला पाहिजे. त्याचप्रमाणे त्यांचाही आणि आमचाही कुठेही मनभेद नाही. फार दिवसांची इच्छा होती राज ठाकरेंना भेटायची. त्यांच्यासोबत गप्पा मारायची. त्यामुळे यात कोणताही राजकीय विषय नव्हता असं संजय शिरसाठ म्हणाले आहेत.
अमित शहा यांच्या भेटीनंतर राज ठाकरे आता महायुती सोबत जाऊन निवडणुका लढवणार अशी चर्चा होती. परंतु अद्याप यावर अधिकृत कोणतीही घोषणा झालेली नाही.