बारामती : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेतेमंडळी एकमेकांवर जोरदार टीकाटिप्पणी करत आहेत. दरम्यान बारामतीमध्ये लढत ही महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे आणि महायुतीच्या सुनेत्रा पवार अशी आहे. या दोघींचा प्रचार त्या वैयक्तिक करण्यापेक्षा अधिक स्वतः ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे करत आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे सातत्याने त्यांचे सख्खे भाऊ आणि कुटुंबीयांबाबत टीकाटिपणी करत आहेत. बारामतीमध्ये त्यांनी त्यांची संपूर्ण ताकद लावली आहे. यावरूनच आता आमदार रोहित पवार यांनी त्यांच्यावर बोचरी टीका करताना म्हटले आहे की, भाजपला अजित पवारांना लोकल नेता बनवल आहे.
नेमकं काय म्हणाले रोहित पवार
अजित पवारांवर टीका करताना रोहित पवार म्हणाले आहेत की, ” भाजपने अजित पवार यांना लोकल नेता बनवले. शरद पवारांच्या नेतृत्वात काम करायचे तेव्हा अजित पवार महाराष्ट्रभर फिरायचे. पण सध्या मात्र ते बारामतीत अडकले आहेत. शरद पवारांच्या वयासंदर्भात कायम बोलले जाते. आज आमचा 70 वर्षाचा युवा नेता राज्यभर 40 ते 50 सभा घेणार आहे. मात्र अजित पवार फक्त बारामतीत फिरताना दिसत आहेत. महाराष्ट्रभर अजित पवारांनी बोलू नये अशी भाजपची इच्छा आहे. त्यांच्या बाबत राज्यात नकारात्मक वातावरण असून बारामतीत अजित पवारांचा उमेदवार तीन लाखांनी मागे दिसत आहे. अशी बोचरी टीका रोहित पवार यांनी अजित पवारांवर केली आहे.