पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील दोन टप्प्यातील निवडणुका पार पडल्या आहेत. सात मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील निवडणूक पार पडणार आहेत. दरम्यान सात मे रोजी बारामती लोकसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार असून बारामतीमध्ये शरद पवारांची सभा पार पडली. परंतु त्यानंतर शरद पवारांची प्रकृती खराब झाल्याची माहिती मिळते आहे.
दरम्यान निवडणुकीच्या दगदगीमुळेच त्यांची प्रकृती खराब झाली आहे. आणि घसा बसल्याच्या कारणामुळे इतर सभा रद्द करण्यात आल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी सांगितले आहे. यावर अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून शरद पवार यांच्या तब्येतीबाबत काळजी व्यक्त केली आहे.
हेमंत ढोमे यांनी लिहिले आहे की, ” आदरणीय साहेब आपली मेहनत घेण्याची क्षमता आणि चिकाटी आम्हा तरुणांना देखील थक्क करणारी आहे. कृपया स्वतःची काळजी घ्या. तब्येत जपा.. खंडोबा आपणास लवकरात लवकर बरे करो..! ” असं हेमंत ढोमे यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज पर्यंत राजकारणातील अनेक उतार चढाव पाहिले आहेत. भर पावसामध्ये त्यांच्या भाषणांनी निवडणुकीचा रोख बदलला होता. या निवडणुकीमध्ये देखील त्यांनी आत्तापर्यंत 40 सभांमध्ये आपल्या उमेदवारांसाठी भाषण केली आहेत. दरम्यान या सभांमधील सातत्याने होणारी भाषण , जागरण , प्रवास यांमुळे त्यांच्या प्रकृतीमध्ये खलल आला आहे. असं पवार कुटुंबाच्या वतीने सांगण्यात आले.