रशिया-युक्रेन युद्ध संपतान्याचे नाव घेत नाहीये. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, आज शुक्रवारी पहाटे लव्हिव्ह मध्येही स्फोट Blast झाले आहेत. या स्फोटामुळे निवासी इमारत आणि गोदामाला आग लागली. या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले असल्याची देखील माहिती आहे.
कीव शहराच्या लष्करी प्रशासनाने दोन जिल्ह्यांमध्ये ढिगारा कोसळल्याची माहिती दिली. तसेच या घटनेत अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. मात्र, यापेक्षा अधिक अपडेट्स समोर आलेले नाहीत. रशियन हल्ल्यात निवारा म्हणून वापरण्यात आलेल्या भुयारी रेल्वे स्थानकाच्या इमारतीचेही नुकसान झाले.
कीव्हच्या महापौरांनी सांगितले की, कीव्हमध्ये शुक्रवारी पहाटे एकापाठोपाठ अनेक स्फोटांचे आवाज ऐकू आले, त्यानंतर हवाई संरक्षण यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. व्हिटाली क्लित्स्को यांनी टेलिग्राम मेसेंजरवर सांगितले की, राजधानीत आणखी स्फोट झाले. हवाई संरक्षण सखोलपणे काम करत आहे. लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनवर संयुक्त हवाई हल्ला करण्यात आला.
खार्कीवमध्ये एका नागरिकाचा मृत्यू
खार्कीव्हच्या महापौरांनी सांगितले की, रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात खार्कीव्हमध्ये एका नागरिकाचा मृत्यू झाला आणि सुमारे 8 लोक गंभीर जखमी झाले. या क्षेपणास्त्र हल्ल्यात औद्योगिक पायाभूत सुविधांचेही मोठे नुकसान झाले आहे.