आजपासून 24 वर्षांपूर्वी कारगीलच्या पर्वतरांगांवर भारतीय सैनिकांच्या विजयाची शौर्यगाथा लिहली गेली.पाकिस्तानी सैनिकांना अस्मान दाखवत करगिलच्या पर्वतरांगांवर भारतीय सैनिकांनी डौलाने तिरंगा फडकावला. 26 जुलै हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून देशभरात अभिमानाने साजरा करत असताना भारतीय सैन्याची शौर्यगाथा सांगणारा महाटॉक्सचा हा खास लेख.
कारगिल युद्ध काय होते?
1999 साली भारत आणि पाकिस्तानच्या सैन्यांमध्ये लढले गेलेलं युद्ध म्हणून कारगिल युद्धाला ओळखले जाते. लडाख प्रदेशातील कारगिल या दुसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या शहरामध्ये हे भारत आणि पाकिस्तान सैन्यांमध्ये संघर्ष झाला म्हणून या युद्धाला कारगिल युद्ध म्हणतात.
कारगिल युद्धाची सुरूवात
भारत स्वतंत्र झाल्यापासूनच भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये सीमेवरून वाद कायम आहे. पाकिस्तानकडून वारंवार सीमा ओलांडून भारताच्या हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला गेला. 1999 मध्ये पाकिस्तानी सैन्याने मोठया प्रमाणात भारताच्या सीमेत घुसखोरी केली. ३ मे १९९९ च्या दिवशी एका गुराख्याने करगिलमध्ये पाकिस्तानी सैन्याने घुसखोरी केल्याची बातमी भारतीय सैन्याला कळवली. पुढे मे ते जुलै जवळपास 79 दिवस या युद्धाचा थरार निरंतर चालू होता.
भारतीय सैन्याचे युद्धभूमीवरचे पाहिले पाऊल
5 मे ते 15 मे दरम्यान भारतीय सैनिकांनी कारगिलमध्ये सर्वेक्षण सुरू केले. सर्वेक्षणादरम्यान कॅप्टन सौरभ कालिया बेपत्ता झाले. पाकिस्तानी घुसखोरांना पळवून लावण्यासाठी 25 मे रोजी हवाई दलाला हल्ला करण्याचा आदेश प्राप्त झाला आणि २६ मे रोजी हल्ले सुरू झाले. या प्रसंगाला कारगिल युद्धभूमीवरील भारतीय सैन्याचे पाहिले पाऊल म्हणता येईल.
कारगील युद्धातील जीवित हानी
कारगिल युद्धात मातृभूमीच्या रक्षणार्थ भारताच्या 500 जवानांनी हौतात्म्य पत्करले. तर सुमारे 1300 जवान या युद्धात जखमी झाले.
भारतीय सैन्याने केलेल्या कारवाईत पाकिस्तानी सैन्यातील 2700 सैनिकांचा या युद्धात मृत्यू झाला.
कारगिल युद्धाचा घटनाक्रम
मे ४ : कारगिलमधील उंच ठिकाणांवर पाकिस्तानी सैन्याने ताबा मिळवल्याची बातमी हाती आली.
मे ५ ते मे १५ : या दहा दिवसांमध्ये भारतीय लष्कराच्या तुकड्यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे सर्वेक्षण केले. यामध्ये कॅप्टन सौरभ कालिया बेपत्ता झाले. त्यांना पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेऊन छळ करुन ठार केल्याचे बोलले जाते.
मे २६ : भारतीय हवाई दलाने कारगिलमधील पाकिस्तानी सैन्याच्या छावण्यांवर हवाई हल्ले सुरु केले. श्रीनगर, अवंतीपूर आणि आदमपूर एअरबेसवरून मीग २१, मीग २३, मीग २७, जॅग्वार, मीरेज २००० या लडाकू विमानांनी पाकिस्तानी तळांवर बॉम्ब हल्ले केले.
मे २७ : भारतीय हवाई दलाच्या मीग २७ विमानाला अपघात होऊन ते कारगिलमध्ये पडले. विमान कोसळण्याआधी पॅरेशूटच्या सहाय्याने विमानाबाहेर आलेल्या वैमानिकाला पाकिस्तानी सैन्याने युद्ध कैदी म्हणून ताब्यात घेतले. त्यानंतर आठ दिवसांनी या वैमानिकाला पाकिस्तानी सैन्याने भारताच्या ताब्यात दिले.
मे ३१ : पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी कारगिलमध्ये ‘युद्धसदृश्य परिस्थिती’ असल्याची माहिती देशाला दिली.
जून १० : पाकिस्तानने छिन्नविछिन्न अवस्थेतील विटंबना केलेल्या सहा भारतीय जवानांचे मृतदेह भारताच्या ताब्यात दिले. हे मृतदेह कॅप्टन सौरभ कालिया आणि त्यांच्या टीममधील सैनिकांचे होते. ही टीम पाकिस्तानने कारगिलमध्ये घुसखोरी केल्याचे वृत्त हाती आल्यानंतर सर्वेक्षणासाठी गेली होती.
जून १२ : दिल्लीमध्ये दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक निष्फळ ठरली. भारताचे परराष्ट्र मंत्री जसवंत सिंग आणि पाकिस्तानचे परराष्ट मंत्री सरताज अजीज यांची भेट दिल्लीत झाली. मात्र चर्चेनंतर पाकिस्तानने आडमुठी भूमिका घेत भारतालाच कारगिल परिसरातून परत जायला हवे असे सांगितले.
जून १५ : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना कारगिलमधून सैन्य मागे घेण्याची विनंती केली.
जून २९ : भारतीय लष्कराने टायगर हिल्स प्रदेशातील दोन महत्वाच्या चौक्या ताब्यात घेतल्या.
जुलै ४ : संपूर्ण टायगर हिल्स प्रदेशावर भारतीय लष्कराने ताबा मिळवला. भारतीय लष्कराच्या तीन तुकड्यांनी १८ ग्रेनेडियर्स, २ नागा आणि ८ शिख बटालियनने या प्रदेशात जोरदार गोळीबार करुन हा प्रदेश ताब्यात घेतला. अमेरिकेत वॉशिंग्टनमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांची भेट घेतली.
जुलै ५ : शरीफ यांनी पाकिस्तान कारगिलमधून सैन्य मागे घेत असल्याची घोषणा केली.
जुलै ११ : पाकिस्तानने कारगिलमधून सैन्य मागे घेण्यास सुरुवात केली.
जुलै १४ : भारताने ऑप्रेशन विजय यशस्वी झाल्याची घोषणा केला.
जुलै २६ : कारगिल युद्धाच्या संपल्याची औपचारिक घोषणा केली.
पाकिस्तानची क्रूरता आणि भारतीय सैनिकांची आदर्श कृती
कारगिल युद्धादरम्यान जाट रेजिमेंटचे कॅप्टन सौरभ कालिया आणि त्यांच्या टीममधील 5 सैनिकांना पाकीस्तानने सिगारेटचे चटके दिले, कानाला छिद्रे पाडून क्रूरपणे ठार केले. स्वतःच्या जवानांचे शव देखील घेण्यास पाकीस्तानने नकार दिला त्यामुळे भारतीय सैनिकांनीची पाकीस्तानी सैनिकांच्या बेवारस मृतदेहांवर इस्लामिक पद्धतीने सन्मानाने दफन करत अंत्यविधी केला.