Chandrayaan-3: इस्रोसोबतच संपूर्ण भारताचं स्वप्न असलेल्या चांद्रयान -3 ने अंतराळात उड्डाण घेतलंय आणि त्याचबरोबरीने सर्व भारतीयांच्या आशा देखील उंचावल्या आहेत. अशाप्रकारचं मून मिशन भारताने पहिल्यांदाच केलं नाहीय.याआधी भारताने तीन वेळा मून मिशन केलंय.चांद्रयान ३ च्या मोहिमेतून भारताने तिसऱ्यांदा आपलं पाऊल चंद्राच्या दिशेने टाकलंय.जवळपास ४५ ते ५० दिवसांचा प्रवास करून चांद्रयान ३ हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लॅंड करणार आहे. हे मिशन जर यशस्वी ठरलं तर चंद्रावर पाऊल ठेवणारा भारत हा चौथा देश ठरणार आहे. जसं एखाद्या यशामागे अपयश लपलेलं असतं अगदी तसंच या चांद्रयान ३ च्या बाबतीतही म्हणावं लागेल. चांद्रयान ३ चं लॉंचिंग पाहताना अनेकांच्या डोळ्यात यापूर्वीच्या मून मिशनच्या आठवणी नक्कीच जाग्या झाल्या असतील. जाणून घेऊया चांद्रयान १ पासून ते चांद्रयान ३ पर्यंतचा प्रवास….
चांद्रयान-3 ने चंद्रावर पाऊल टाकण्यासाठी उड्डाण घेतलंय. हा भारतासाठी अभिमानाचा क्षण असून यानिमित्ताने चांद्रयान २ मोहिमेच्या आठवणी पुन्हा एकदा जाग्या झाल्यात. चांद्रयान २ च्या अपयशामुळे भावुक झालेले इस्रोचे वैज्ञानिक कोण विसरू शकेल? पण आता त्या अपयशाच्या कडू आठवणी विसरून नव्याने चंद्रावर स्वारी करण्यासाठी इस्त्रो आणि चांद्रयान ३ पुढे सरसावले आहेत. खरं तर या मिशनची सुरूवात
२२ ऑक्टोबर २००८ रोजी लाँच झालेल्या चांद्रयान-1 पासून झाली. पहिल्यांदाच भारताने या मिशनमधून चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला होता. पण या मोहिमेत चंद्राच्या पृष्ठभागावर बग्गी उतरवण्याचे उद्दिष्ट नव्हते. त्यावेळी १.४ टन वजनाचा उपग्रह चंद्राच्या कक्षेत १०० किमी अंतरावर सोडण्यात आला होता.मात्र एक वर्षाने ही मोहीम काही तांत्रिक कारणाने सोडून दिली होती.चांद्रयान १ मधून मिळालेल्या माहितीचा पुढील चंद्र मोहिमेसाठी उपयोग करण्यात आला. या यशस्वी टप्प्यानंतर भारत हा चंद्राच्या कक्षेत यान टाकणारा जगातील पाचवा देश बनला. आजही चांद्रयान 1 मुळेच भारताचे नाव गर्वानं घेतलं जातं.कारण देशातील हे एक महत्वाचे मिशन होते की, त्याधून जगातील लोकांना चंद्रावर पाणी असल्याचं कळलं होतं.
त्यानंतर सुरू झालं चांद्रयान २ चं मिशन…चांद्रयान १ ने 3400 फेऱ्यांच्या दरम्यान जवळजवळ 70 हजार थ्री-डी फोटो पाठवले होते. त्याचसोबत टेरेन मॅपिंग कॅमेऱ्यातून पहिल्यांदाच चंद्रावरील खड्ड्यांचे फोटो घेण्यात आले होते. तर 25 मार्च 2009 मध्ये चांद्रयान 1 ने पृथ्वीचा फोटो देखील पाठवला होता. चांद्रयान १ मधून मिळालेल्या सर्व माहितीचा उपयोग हा पुढच्या चांद्रयान २ साठी करण्यात आला. २०१९ मध्ये चांद्रयान-२ लॉन्च केलं. यामध्ये ऑर्बिटर, विक्रम लॅंडर आणि प्रज्ञान रोवर यांचा समावेश होता. या मिशनचं लक्ष्य चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लॅंडिंग करणं होतं. परंतु, लॅंडरमध्ये बिघाड झाल्याने लॅंडिंग करणं कठीण झालं.तीन महिन्यांनंतर अमेरिकन अंतराळ संस्था नासाला त्याचा अवशेष सापडला. चांद्रयान २ च्या अपयशामुळे भारतीयांसह इस्त्रोचे वैज्ञानिकही निराश झाले होते. त्यावेळी भावूक झालेले इस्रोचे अध्यक्ष के सिवन पंतप्रधा नरेंद्र मोदींनी मिठी मारतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच चर्चेत आला होता.
चांद्रयान २ च्या अपयशाने खचून न जाता आपल्या भारतीय वैज्ञानिकांनी पुन्हा त्याच जोमाने चांद्रयान ३ च्या मिशनला सुरूवात केली. चांद्रयान २ मध्ये काय चुकलं आणि काय करायला हवं यावर चार वर्ष जीवतोड मेहनत घेऊन भारतीय वैज्ञानिकांनी चांद्रयान-३ च्या माध्यमातून पुन्हा एकदा लँडर आणि रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवण्याचा प्रयत्न सुरू केला.आता चांद्रयान-३ मिशनच्या माध्यमातून भारत या महत्वाच्या प्रोजेक्टला पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे.ही चांद्रयान-3 मोहिम यशस्वी झाल्यास चंद्रावर पाऊल ठेवणार भारत चौथा देश ठरेल.
चांद्रयान-3 हे चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित लँडिंग आणि रोव्हर महत्त्वाचे नमुने आणि माहिती गोळा करेल. चांद्रयान 3 च्या लँडरचं नाव विक्रम आणि रोव्हरचं नाव प्रज्ञान आहे. चंद्रावर पोहोचण्यासाठी एका महिन्यापेक्षा जास्त वेळ लागू शकतो. 23 किंवा 24 ऑगस्ट रोजी ते चंद्राच्या पृष्ठभागावर उतरू शकतं. पण ही तारीख मागे-पुढे देखील होऊ शकते.