Foxconn – Vedanta Deal : उद्योगपती अनिल अग्रवाल यांची कंपनी वेदांता लिमिटेडशी संबंधित एक मोठी बातमी समोर आलीये. वेदांतासोबत तैवानी कंपनी फॉक्सकॉनसोबत केलेला करार ब्रेक करण्यात आलांय. सेमीकंडक्टर प्लांट उभारण्यासाठी वेदांतासोबत हा करार करण्यात आला होता. गेल्या वर्षीच, दोन्ही कंपन्यांनी गुजरातमध्ये सुमारे 1 लाख 54 हजार कोटी रूपयांची गुंतवणूक करून प्रकल्प स्थापन करण्याची घोषणा केली होती. हा प्रकल्प पुण्याच्या तळेगाव येथे प्रस्तावित होता. पण गुजरात विधानसभा निवडणुकीच्याआधी हा प्रकल्प गुजरातला नेण्यात आला. (Foxconn – Vedanta Deal)
कोणतेही कारण न देता करार तोडला
फॉक्सकॉनने सोमवारी सांगितलं की, ते भारतातून सेमीकंडक्टर बनवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या वेदांता लि.सोबतच्या संयुक्त उपक्रमातून बाहेर पडत आहे. फॉक्सकॉनने कोणतेही कारण न देता करार रद्द केलांय. वेदांतसोबतचा करार रद्द झाल्यामुळे अनिल अग्रवाल यांच्या योजनेला फटका बसलांय. फॉक्सकॉन भारताच्या सेमीकंडक्टर विकासाच्या दिशेने आशावादी आहे. सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाला आमचा भक्कम पाठिंबा राहील, असं कंपनीने सांगितलं.
फॉक्सकॉनचे नाव काढून टाकण्याचा निर्णय
तैवानच्या इलेक्ट्रॉनिक्स निर्मात्याने सांगितलं की, फॉक्सकॉन आता वेदांताच्या पूर्ण मालकीच्या युनिटमधून फॉक्सकॉनचे नाव काढून टाकण्याचं काम करत आहे. आता त्यांनी परस्पर करार संपवण्याचा निर्णय घेतलांय. याआधी शुक्रवारी अनिल अग्रवाल यांच्या वेदांता समूहाने सांगितलं होतं की, ते संयुक्त उपक्रमाची होल्डिंग कंपनी ताब्यात घेईल, ज्याने सेमीकंडक्टर बनवण्यासाठी फॉक्सकॉनशी करार केला होता. त्याचबरोबर ते व्हल्कन इन्व्हेस्टमेंट्सकडून डिस्प्ले ग्रास निर्मितीचा उपक्रमही ताब्यात घेणारे.
वेदांता लिमिटेडने एक निवेदन जारी केलंय
अनिल अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील वेदांता लिमिटेडने एक निवेदन जारी केलंय आणि त्यावर टिप्पणी केलीये. वेदांताच्या मते, ते सेमीकंडक्टर प्रकल्पासाठी वचनबद्ध आहे आणि भारताच्या पहिल्या सेमीकंडक्टर प्रकल्पासाठी इतर भागीदारही शोधले आहेत. लवकरच उत्पादन ग्रेड 28nm परवाना मिळण्याचा विश्वास कंपनीने व्यक्त केलांय.