रविवारच्या (2 जुलै) अचानक झालेल्या शपथविधीमध्ये अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. या ९ मंत्र्यांमध्ये राष्ट्रवादीच्या आमदार Aditi Tatkare यांचेही नाव आहे. आदिती तटकरे यांच्यामुळे महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात तब्बल वर्षभरानंतर महिला मंत्र्याचा समावेश झाला आहे.
शिंदे-फडणवीस यांच्या सरकारला १ वर्ष झालं तरीही त्यांच्या मंत्रीमंडळात आतापर्यंत एकाही महिला मंंत्र्याचा समावेश नव्हता. ‘महिला व बाल विकास’ हे खातं देखील एका पुरुष मंत्र्याकडे देण्यात आलेलं होतं. खरंतर या खात्याची स्थापना 1993 साली करण्यात आली असून महिला व बालविकास स्वतंत्र खाते सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील प्रथम राज्य आहे. राज्याच्या मंत्रीमंडळात महिलांचं प्रतिनिधित्व नसल्याने सरकारवर टिका देखील केली जायची.
आता मात्र आदिती तटकरे यांना मंत्रीमंडळात स्थान देण्यात आल्यानंतर ही टिका बंद होईल, असं दिसतंय. मात्र त्यांच्या वाट्याला कोणतं खातं येणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये. येत्या काळात पुन्हा एकदा मंत्रीमंडळ विस्तार होणार, अशी चर्चा आहे. त्यावेळी देखील राज्याच्या मंत्रीमंडळात आणखी काही महिलांचा समावेश करण्यात येईल, अशी शक्यता आहे.
उद्धव ठाकरेंच्या मंत्रीमंडळात किती महिला मंत्री?
यापूर्वीच्या सरकारमध्ये म्हणजेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राज्याच्या मंत्रीमंडळात ३ महिलांना संधी देण्यात आलेली होती. काँग्रेसकडून यशोमती ठाकूर आणि वर्षा गायकवाड यांना कॅबिनेट मंत्री पद देण्यात आलं होतं. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आदिती यांना राज्यमंत्री पद देण्यात आलं होतं. तीन पक्षांच्या या सरकारमध्ये शिवसेनेकडून मात्र कोणत्याही महिलेला मंत्रीपदाची संधी देण्यात आलेली नव्हती.
यापूर्वी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच्या काळात त्यांच्या सरकारमध्ये देखील २ महिला मंत्री होत्या. भाजप नेत्या पंकजा मुंडे या कॅबिनेट मंत्री होत्या तर विद्या ठाकूर राज्यमंत्री होत्या.
अदिती तटकरे यांचा राजकीय प्रवास (Aditi Tatkare Political journey)
आदिती तटकरे या ३५ वर्षाच्या तरुणी असून त्यांनी पद्युत्तर शिक्षण घेतलेलं आहे. रायगड जिल्ह्यातील रोहा येथील त्या रहिवासी आहेत. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांच्या त्या कन्या आहे.
२०१७ ते २०१९ दरम्यान आदिती रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष होत्या.
२०१९ मध्ये प्रथमच महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जिंकून अदिती श्रीवर्धन येथून आमदार झाल्या. त्यानंतर ३० डिसेंबर २०१९ ते २९ जून २०२२ या काळात आदिती महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री होत्या. .या काळात उद्योग, पर्यटन, क्रीडा, खनिकर्म, फलोत्पादन आणि माहिती व जनसंपर्क या महत्वाच्या खात्यांची जबाबदारी आदितींवर राज्यमंत्री म्हणून सोपवण्यात आली होती.
अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ज्या ९ आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली त्या आमदारांमध्ये आदिती तटकरे देखील आहेत.
पहिल्याच आमदारकीच्या कार्यकाळात दुसऱ्यांदा मंत्रीपद आदिती तटकरे यांना मिळालं आहे.
आदिती यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याने कुणाची कोंडी?
भरत गोगावले, महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे या तिन्ही शिवसेनेच्या आमदारांचा आदिती तटकरे यांना महाविकास आघाडी सरकारच्या काळात विरोध असल्याचं सांगितलं जातं. त्यावेळी सत्तेत असून देखील या आमदारांना तटकरे यांच्यामुळे पुरेसा निधी मिळत नव्हता असा त्यांचा आरोप होता. सध्या शिंदे गटात असलेल्या या आमदारांची आदिती तटकरे देखील सरकारमध्ये सामील झाल्याने कोंडी झाली असल्याची चर्चा आहे.