सोयगाव : सोयगाव तालुक्यात सावरखेडा गावात दुष्काळाची झळा गडद होताना दिसत आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणी प्रश्न बिकट होत आहे. तालुक्यातील दुर्गम भागात असलेले व तीनशे लोकांची वस्ती असलेले सावरखेडा (ब) पांढरी या गावात अक्षरशः महिलांना दीड ते दोन किलोमीटर पायपीट करून दोनशे फुटाच्या दरीमध्ये खाली उतरून हंडाभर पाण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागत आहे. त्यातच त्यात तुबेलेलं पाणी अशुद्ध व गढूळ असल्याने त्याना तेच पाणी पिण्याची नामुष्की ओढवून आली आहे.
सावरखेडा येथील ग्रामस्थांच्या पाण्यासाठीच्या जीवघेणा खेळाकडे ग्रामपंचायत सरपंच ,ग्रामसेवक यांनी काना डोळा केला असून ग्रामस्थांनी स्वतःचा निधी जमा करून याठिकाणी पाण्याची सुविधा उपलब्ध करण्याची मागणी तसेच गावात जवळच असलेली विहीर शासनाने अधिग्रहण करून तिला गावात पाण्यासाठी उपलब्ध करून देण्याची मागणी प्रशासनाकडे वारांवर लेखी अर्ज देऊन मागणी केली आहे.
सोयगाव तालुका प्रशासन या गावातील पाणी प्रश्नाकडे गंभीरतेने लक्ष देत नसून लोकसभा आचारसंहितेचे सोंग घेवून गावकऱ्यांच्या पाणीप्रश्नाकडे दुर्लक्ष करीत आहे ,या गावाकडे आमदार ,खासदार यांचे देखील दुर्लक्ष झाले असून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदार संघातील गावातील अशी परिस्थिती असून त्यांनी देखील हा प्रश्न वर्षनुवर्षं गंभीरतेने घेतले नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले आहे तसेच हंडाभर पाण्यासाठीच्या या जीवघेण्या कसरती मध्ये एखाद्याचा जीव गेला तर याला सर्वस्वी कारणीभूत सोयगाव प्रशासन राहणार असल्याचे देखील सावरखेडा (ब) पांढरी गावातील ग्रामस्थांनी सांगितले आहे.