पैठण : छत्रपती संभाजीनगर मधील पैठण एमआयडीसीमधील MIDC एक अत्यंत संतापजनक प्रकार समोर आला आहे. आजपर्यंत कंपनीतील मैलामिश्रित केमिकल युक्त पाणी हे नदीमध्ये सोडलं जात होतं. तर आता थेट हे मैलामिश्रित पाणी शेतकऱ्यांच्या विहिरीत सोडले जाते.
ही बाब खरंतर अत्यंत संतापजनक आहे. कारण हेच पाणी शेतकरी पिकांना वापरत असतात. या केमिकल युक्त पाण्यामुळे पिकांचं केवळ नुकसान नाही तर पुढे संपूर्ण महाराष्ट्राला देखील आरोग्याचे अनेक प्रश्न यामुळे निर्माण होऊ शकतात. हा प्रश्न आता केवळ पैठणच्या एमआयडीसीमधील असला तरी अत्यंत गंभीर असून यावर तातडीने कारवाई करणे आवश्यक आहे.
या पाण्यामुळे शेतजमिनी, पीक आणि जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न तर आता ऐरणीवर आलाच आहे. परंतु धक्कादायक म्हणजे या शेतकऱ्यांनी तक्रार करून देखील संबंधित अधिकाऱ्यांनी कोणतीही दखल किंवा कारवाई अद्याप पर्यंत केलेली नाही.
शेतकऱ्यांशी याबाबत विचारणा केली असता शेतकऱ्यांनी सांगितलं की, हे पाणी शेतजमिनी, पीक आणि जनावरांसाठी अत्यंत हानिकारक तर आहेच तसेच या पिकामुळे नागरिकांना देखील मोठा त्रास सहन करावा लागू शकतो. त्याचबरोबर हे केवळ जलप्रदूषणच नाही तर पाण्याच्या जवळ गेल्यानंतर अत्यंत दुर्गंधी आणि डोळ्यांमध्ये चुनचुन देखील होते आहे. अशी तक्रार त्यांनी केली. यावरूनच हे पाणी किती प्रमाणात केमिकल युक्त झाले आहे याचा अंदाज येऊ शकतो. त्यामुळे प्रशासन आता यावर केव्हा आणि कशी कारवाई करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
संभाजीनगर प्रतिनिधी : देव राजळे