Shantabai Kopargaonkar : महाराष्ट्र कलेचं माहेरघर म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने समृद्ध करण्यात कलाकारांचा मोलाचा वाटा आहे. त्यापैकी लावणी म्हणजे महाराष्ट्रातल्या अनेकांसाठी आवडीची कला. खरंतर गौतमी पाटीलच्या आजच्या युगात खरी लावणी म्हणजे काय असते याची कल्पना आजच्या तरुणाईला नाहीच. काळ बदलतोय तसं कलेचं आणि कलाकारांचं टिकणं आणखी कठीण होत असल्याचं दिसतं. त्याचं सध्या चर्चेत असलेलं उदाहरण म्हणजे लावणीसम्राज्ञी शांताबाई कोपरगावकर.
एकेकाळी आपल्या लावणीने महाराष्ट्राला खिळवून ठेवणाऱ्या लावणीसम्राज्ञी शांताबाई कोपरगावकर वयाच्या ७५ व्या वर्षी बसस्थानकावर विदारक अवस्थेत आयुष्य जगत असतानाचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला. या व्हिडीओमुळे कलाक्षेत्रासह महाराष्ट्रातील अनेकजण हळहळून गेले. त्यानंतर महिला आयोग, राज्य सरकार अशा वेगवेगळ्या पातळींवर हालचाली झाल्या आणि शांताबाईंना मदत देण्याचे प्रयत्न सुरु झाले.
शांताबाई कोपरगावकर कोण आहेत? (Who is Shantabai Kopargaonkar)
शांताबाई कोपरगावकर यांचे मूळ नाव शांताबाई लोंढे असे आहे. शांताबाई भटक्या समाजातून येतात. लहानपणापासूनच त्या तमाशात नृत्य करु लागल्या होत्या. सुरुवातीच्या काळात केवळ नृत्य करणाऱ्या शांताबाई नंतर गायिका देखील झाल्या. भिका-भीमा सांगवीकर, धोंडू-कोंडू सिंधीकर, शंकरराव खिर्डीकर, रसुल पिंजारी वडितकर अशा वेगवेगळ्या तमाशाचे फड शांताबाईंने एकेकाळी गाजवले होते.
‘या रावजी बसा भावजी, ओळख जुनी धरून मनी, काय करू सांगा मी मरजी..’ ही लावणी सर्व मराठी रसिकांना आजही माहीत आहे. एकेकाळी याच शांताबाईच्या लावणी नृत्याने महाराष्ट्र गाजवला होता. मुंबईतील लालबाग – परळच्या हनुमान थिएटरला त्यांचा कार्यक्रम अनेकदा व्हायचा. त्यांची कला, सौंदर्य आणि लोकप्रियता पाहून चाळीस वर्षांपूर्वी कोपरगाव बसस्थानकातील कर्मचारी अत्तारभाई यांनी ‘शांताबाई कोपरगावकर’ हा तमाशा काढला होता.
यात्रा, तमाशामुळे प्रसिद्धी आणि फसवणूक
शांताबाई कोपरगावकर हा 60 हुन अधिक कलाकारांचा चमू असणारा तमाशा महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाला होता. यात्रा-जत्रेत तमाशाला मोठी गर्दी व्हायची. शांताबाईच्या नावावर बक्कळ पैसा देखील मिळू लागला होता. मात्र याच शांताबाईंच्या निरक्षरतेचा फायदा घेत त्यांचा सहकारी अत्तरभाई याने त्यांची फसवणूक केली आणि तमाशा विकून टाकला. तमाशाचा फड विकल्यामुळे शांताबाईवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. त्यांना याचा मोठा मानसिक फटका बसून त्या मानसिक आजाराने ग्रासल्या गेल्या. या परिस्थितीत त्यांना सावरायला पती किंवा जवळचे नातेवाईक नसल्याने त्यांचे आणखी हाल झाले. त्यांचा एक भाचा आहे पण तो देखील मजुरी करुन जगतो. त्यामुळे शांताबाईंची परिस्थिती अत्यंत हलाखीची झाली.
व्हायरल व्हिडिओमुळे चर्चेत (Shantabai Kopargaonkar viral video)
काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर एक व्हिडिओ व्हायरल झाला. ‘ओळख जुनी धरून मनी’ ही लावणी गात बसलेली आणि बसस्थानकावर भिक्षा मागणारी एक बाई या व्हिडीओमध्ये दिसत होती. ही बाई दुसरं कोणी नसून शांताबाई कोपरगावकर होत्या. या बाईची अदाकारी, लकब, हातांची फिरकी बघून कुणीतरी त्यांचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकला आणि शांताबाई कोपरगावकर यांचं विदारक वास्तव समोर आले.
खान्देशातील काही तमाशा कलावंतांनी हा व्हिडिओ बघितला आणि कोपरगाव तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते अरुण खरात यांना पाठवला. त्यानंतर खरात यांनी शांताबाईंचा शोध घेतला. कोपरगाव बसस्थानकात शांताबाई त्यांना दिसल्या. त्यानंतर अरुण खरात आणि त्यांचे मित्र डॉ. अशोक गावीत्रे यांनी शांताबाईंना रुग्णालयात नेले आणि त्यांच्यावर उपचार सुरु केले. त्यानंतर अनेक लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था यांनी पुढाकार घेत शांताबाईंनी मदत करण्याची तयारी दर्शवली.
मुख्यमंत्री, महिला आयोगाकडून दखल
जुन्या पिढीतल्या अनेक प्रसिद्ध लावण्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ तमाशा कलावंत शांताबाई कोपरगावकर यांची परिस्थिती सध्या बिकट बनली आहे. याची दखल घेऊन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी याबाबत महिला व बालविकास अधिकाऱ्यांना त्यांची मदत करण्याचे निर्देश दिले.
चाकणकर यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे. “तमाशा कलावंत शांताबाई कोपरगावकर या ज्येष्ठ मराठी कलाकारावर उतारवयात दयनीय अवस्थेत राहण्याची वेळ आली आहे, अशा आशयाच्या बातम्या माध्यमातून समोर आल्या आहेत. आयोगाच्या वतीनं तातडीनं जिल्हा महिला बालविकास अधिकारी अहमदनगर यांना संपर्क करण्यात आला आहे”, असं ट्विट त्यांनी केलं आहे.
कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे या देखील शांताबाईंच्या मदतीला धावून आल्या. त्यांनी शांताबाईंची भेट घेत शिर्डीतील एका वृद्धाश्रमात त्यांची राहण्याची व्यवस्था करुन दिली. तसेच शांताबाईंना काही साड्या आणि खर्चासाठी पैसेदेखील दिले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेनूसार जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी शांताबाईंची वृद्धाश्रमात भेट घेतली. शासकीय योजनांचा लाभ त्यांना मंजूर केला जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.
शांताबाईंना राज्य शासनाच्या योजनांमधून सन्मानजनक मानधन मिळावं, निवृत्ती वेतन मिळावं यासाठी आयुक्त, महिला बाल विकास यांना पत्र लिहून शांताबाईंना मदत मिळवून देण्यासाठीचे निर्देश आयोग देत आहे,” अशी माहिती देखील महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली आहे.