सामाजिक न्याय दिवस म्हणून पाळला जाणारा २६ जून हा दिवस म्हणजेच राजर्षी शाहू महाराज यांची जयंती (Shahu Maharaj Birth Anniversary). शाहू महाराज यांनी नेहमीच अन्यायाच्या विरुद्ध केवळ आवाज उठवला नाही तर प्रत्यक्ष कृती केल्याचे अनेक किस्से आपण ऐकले असतील. जातीभेदाबद्दल शाहू महाराजांना प्रचंड राग होता हे या घटनांवरुन आपल्या लक्षात येते. त्यापैकीच एक म्हणजे, कोल्हापूरातील गंगाराम कांबळे यांच्या हॉटेलचा किस्सा.
मराठ्यांचा हौद बाटवला म्हणुन मारहाण
कोल्हापुरातील बावडा बंगल्यात सरकारी पागेत गंगाराम कांबळे नावाचा एक मोतद्दार होता. या पागेत महार मोतद्दारची संख्या मोठ्या प्रमाणात होती. घोड्याची निगा राखणे हे त्यांचे काम होते.
एक दिवस दुपारच्या वेळी पागेतील सर्वजण जेवणासाठी डब्बा उघडून बसले. मात्र त्यादिवशी हौदात पाणीच नव्हतं. बिना पाण्याचं जेवण कस करावं? असा प्रश्न त्यांना पडला. या लोकांना पाण्यासाठी हौदात नळ पण सोडता येत नसायचा, असं केल्यास उच्चवर्णीय लोक आपल्याला दंड देतील या विचाराने सगळे महार शांत बसले होते.
मात्र कितीवेळ असंच बसायचं म्हणून त्यांच्यातील गंगाराम कांबळे याने हिम्मत करून हौदात नळ सोडले. हे कळताच एक मराठा शिपही आणि इतर काही मराठा नोकरांनी मिळून गंगारामला हौद बाटवला म्हणून चाबकाने, लाथा-बुक्यांनी मारहाण केली. शाहू महाराज नेमकं त्या दिवशी कोल्हापुरात नव्हते.
शाहू महाराज कोल्हापुरात परत आल्यानंतर गंगाराम त्याच्या सहकाऱ्यांना घेऊन महाराजांकडे गेला. महाराजांना पाठीवरचे चाबकाचे वळ दाखवत सगळी कहाणी सांगितली. महाराजांना घडलेला प्रकार ऐकून प्रचंड राग आला. त्यांनी मारहाण करणाऱ्यांना तातडीने बोलावणं धाडलं. गंगारामला जशी मारहाण करण्यात आली होती त्याचप्रकारे या शिपायाला देखील फटके देण्यात आले.
या घटनेनंतर महाराजांनी विहीरी हौद अशा जागा सर्वधर्मियांसाठी खुल्या केल्या. ‘सरकारी कॅम्पमध्ये कुठल्याही जलस्त्रोतावर पाणी घेण्याचा अधिकार सर्वांना असेल. एखाद्या व्यक्तीला रोखण्याचा किंवा दंड करण्याचा अधिकार कुणालाही नाही आणि तसे केल्यास त्या व्यक्तीला दंड केला जाईल’, असा नियम काढला.
या सर्व प्रकारानंतर गंगारामला शिक्षा देणाऱ्यांमध्ये प्रचंड रोष होता. महाराजांनी गंगाराम समोरच दंड दिल्याचा राग त्यांच्या मनात होता. महाराजांनी त्यांच्या इन्फन्ट्रीमधील किसन नावाच्या एका कोचमनला त्याच्या कामावर खूश होऊन जरीचा पटका आणि रोख रक्कम बक्षीस दिली होती. हे पैसे चोरीला गेले आणि त्याचा आळ गंगारामवर घेतला गेला. गंगारामला बेदम मारहाण करण्यात आली. “हौद बाटवतो, आमचं नाव महाराजांना सांगतो”, असं मारणाऱ्यांच्या तोंडून ऐकल्यावर गंगारामला खऱ्या प्रकाराचा अंदाज आला.
गंगारामने महाराजांसमोर जाऊन पुन्हा आपल्यासोबत घडलेली घटना ऐकवली. शरीरावरील जखमा दाखवल्या. यावेळी महाराजांना त्याचे हाल बघवले नाही. त्यांनी गंगारामला जवळ बोलवून पाठीवरुन हात फिरवला. महाराजांनी गंगारामला चाकरीतून मुक्त केलं. त्याला स्वतंत्र व्यवसाय चालू करायला सांगितला आणि स्वतः मदत करणार असल्याचं आश्वासन दिलं.
‘सत्यसुधारक हॉटेल’ची सुरुवात
या घटनेनंतर कोल्हापूरच्या भाऊसिंग रोडला ‘सत्यसुधारक हॉटेल’ या नावाने गंगारामने महाराजांच्या म्हणण्यानुसार चहाचं दुकान थाटलं. या दुकानात चांगली साफसफाई गंगाराम ठेवत असे. पण ह़ॉटेल महाराचं आहे हे कळताच लोकं तिथून बाहेर पाडायची.
महाराजांच्या कानावर हा प्रकार आल्यानंतर त्यांनी एक दिवस थेट गंगारामाच्या दुकानाबाहेर घोडागाडी आणली आणि चहाची ऑर्डर दिली. महाराज स्वतः तर चहा प्यायलेच तसेच सोबत असलेल्या उच्चवर्णियांना देखील महाराच्या हॉटेलमधला चहा प्यायला सांगितला. शाहू महाराजांच्या आग्रहाखातर सवर्णांना देखील गंगारामच्या हातचा चहा प्यावा लागायचा. त्यानंतर अनेकदा महाराज गंगारामच्या हॉटेलसमोर येऊन गाडी थांबवायचे आणि चहा घ्यायचे.
इतकंच नाही तर महाराजांनी गंगारामला हेडमास्तरची नोकरी दिली. लिहिती वाचता न येणाऱ्या गंगारामला आयुष्यभर पगार मिळेल याची सोय महाराजांनी केली. नंतरच्या काळात महाराजांनी गंगारामला समाज प्रबोधनाच्या कामाला लावलं.
याच गंगाराम कांबळे यांच्या पुढाकाराने १९२५ ला शाहू महाराजांचे जगातील पहिले स्मारक दलित समाजाने कोल्हापुरात उभारले.