बुलढाणा : काल रात्री (30 जून) समृद्धी महामार्गावर आतापर्यंतचा सर्वात मोठा अपघात झालांय. या अपघातात २५ प्रवासी जागेवरच आगीत होरपळून ठार झालेत. तर ५ प्रवासी गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत.
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा इथे समृद्धी महामार्गावर खासगी बसचा हा भीषण अपघात झालांय. नागपूर ते पुणे या मार्गावरून जात असताना रात्री अचानक ही बस डिव्हायडरला धडकली आणी बसला आग लागली. या बसमध्ये प्रवास करणारे बहुतांश प्रवासी हे यवतमाळ, वर्धा, नागपूर या जिल्ह्यातील आहेत. जवळपास दिड तास बस आगीत जळत होती. या प्रवाशांना मदत करण्यासाठी रस्त्यामध्ये कोणीही थांबलं नाही असं सांगितलं जात आहे. केवळ कॅबिनमध्ये असणारे ५ लोकच या अपघातातून वाचले आहेत.
अपघातग्रस्तांना मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
या अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केले आहे. या अपघातातील मृत व्यक्तींच्या कुटुंबिंयांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत, जखमींना शासकीय खर्च आणि तात्काळ वैद्यकीय उपचार देण्याचे निर्देश आणि घटनेच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. अशी माहिती मुख्यमंत्रांच्या ट्विटर हॅन्डलवरून शेअर करण्यात आलीये.
प्रधानमंत्री आणि गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्दैवी घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. केंद्र सरकारमार्फत मृतांच्या नातेवाईंकांना दोन लाख तर जखमींना 50 हजार रुपये देण्यात येतील, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर हॅन्डलवरून शेअर करण्यात आली आहे.
गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मला प्रचंड दुःख झालं आहे. या अपघातात बळी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंब आणि नातेवाइकांच्या दुःखात मी सहभागी आहे. जखमींनी लवकर बर व्हावं अशी प्रार्थना करतो. स्थानिक प्रशासनाकडून अपघात पीडितांना शक्य ती मदत केली जात आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
ही घटना अतिशय धक्कादायक आणि मनाला वेदना देणारी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. जखमी झालेल्या व्यक्तींचा उपचार राज्य सरकार करेल आणि गरज पडली तर DNA चाचणी करून मृतांची ओळख पटवली जाईल., असं उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया :
हे वृत मन हेलावणारे आहे. गेल्या वर्षभरात या महामार्गावर असे अपघात सुरूच आहेत. आत्तापर्यंत 300 हून जास्त प्रवासी त्यात मरण पावले. सरकारने अपघात टाळण्यासाठी काहीच उपाय योजना केल्या नाहीत. बुलढाण्यातील अपघाताने तरी सरकारचे डोळे उघडावेत. अपघातात जीव गमावलेल्या अभागी जीवांना मी श्रद्धांजली अर्पण करतो, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रतिक्रिया :
आता खासगी वाहनांच्या वेगमर्यादेचा प्रश्न उपस्थित होतोय. यावर राज्य सरकारने गंभीर दखल घेत त्वरित उपाययोजना करायला हव्यात. एक आठवड्यापूर्वीच संबंधित विभागाकडून होत असलेल्या अपघातांची आकडेवारी मागवून, अपघात रोखणाच्या दृष्टीने तातडीच्या उपाययोजना कराव्यात असे मी सुचवले होते, असे शरद पवार म्हणाले.
मुख्यमंत्र्यांच्या ट्विटवर नागरिकांच्या प्रतिक्रिया
वाढत्या अपघाताने सामान्य नागरिक संताप व्यक्त करतायेत. एक वापरकर्ता म्हणाला, त्या गाडीचा PUC संपला आहे. १२ जूनला त्याची समोरची ग्लास फुटली, आणि क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असा स्पष्ट उल्लेख आहे. तरी देखील ती बस रस्त्यावर धावली कशी? चिरी मिरी खाणाऱ्या लोकांवर कारवाई होणार का? या ट्विटसोबत त्याने पुरावा ही दिला आहे.
दुसरा वापरकर्ता ट्विट करत म्हणाला, जरा जाहिराती कमी करुन सर्वसामान्यांच्या सोयीच्या STचे सक्षमीकरण करा. लोकांच्या जिवाचं मोल हे तुम्ही जाहीर करत असलेल्या रकमेपेक्षा जास्त असतं.
अपघाताची कारणे
बसचा टायर फुटून ती डिव्हायडरला आदळली. आदळल्यानंतर बसच्या पेट्रोलची टाकी फुटून आग लागल्याचं सांगण्यात येतंय. खासगी स्लीपर बसला कॅबिन आणि बाकी बसच्या मधात एक दरवाजा असतो. हा दरवाजा शक्यतो बाहेरूनच उघडतो. प्रवाशांना हा दरवाजा आतून उघडता आला नाही. त्यामुळे आत असलेल्या २५ लोकांचा या अपघातात आगीत होरपळून जागीच मृत्यू झाल्याचा अंदाज लावल्या जात आहे.
हे देखील वाचा :
Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर सतत होणाऱ्या अपघाताची कारणं काय?