Rahul Kanal joins Shinde Shivsena : शिवसेनेत पडलेल्या उभ्या फुटीनंतर शिंदे गटाच्या शिवसेनेत जोरदार इन्कमिंग सुरू असल्याचं आपण पाहतोच आहे. यामध्ये सुरुवातीला उद्धव ठाकरेंच्या बाजूने असणाऱ्या अनेकांनी नंतर शिंदेच्या शिवसेनेची वाट धरली. ज्यात अनेकजण ठाकरेंच्या जवळचे मानले जायचे, त्यांनीही अखेर ठाकरेंना रामराम केला. मात्र, आता युवासेनेचे पदाधिकारी आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंचे खंदे समर्थक राहुल कनाल यांनी देखील ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला आहे. हा आदित्य ठाकरेंना मोठा धक्का मानला जात आहेच, पण यामुळे राजकीय वर्तुळात सुद्धा उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. राहुल कनाल हे नक्की कोण आहेत? त्यांच्याविषयी जाणून घेऊयात.
राहुल कनाल कोण आहेत? (Who is Rahul Kanal)
केवळ राजकारणच नाही तर बॉलिवूडच्या सेलिब्रिटींसोबतही घनिष्ट मैत्री असणारे राहुल कनाल मुंबई महापालिकेत स्वीकृत सदस्य होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच्या काळात राज्यातील महत्वाच्या अशा शिर्डी संस्थानाच्या विश्वस्त पदावर देखील त्यांना नेमण्यात आलं होतं. राहुल कनाल आणि आदित्य ठाकरेंची मैत्री तर सर्वश्रुत आहे. आदित्य ठाकरेंच्या अत्यंत जवळचे सहकारी ते असल्याचं बोललं जायचं. युवासेनेमध्ये गेल्या १० वर्षांपेक्षा जास्त काळापासून ते काम करत होते. युवासेनेच्या महत्वाच्या पदांवर देखील राहुल कनाल यांनी काम केलं आहे.
पण असं असतानाही आज तेच राहुल कनाल युवासेनेकडून आपल्याला डावललं जात असल्याचा दावा करत आहेत. ज्यावेळी शिवसेनेत बंड झालं त्यावेळी शिंदे गटात जाणाऱ्या अनेकांनी युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांवर आरोप केले होते. युवासेनेचे पदाधिकारी, तरुण मंडळी आपल्या कामात हस्तक्षेप करत असल्याचं अनेक आमदारांनी म्हंटलं होतं. ज्यात राहुल कनाल यांचं नावही घेतलं जात होतं. मात्र, तेच कनाल आता स्वतःच नाराज असल्याचं दिसून येतंय. त्यांनी ट्विटरवर आपली नाराजी व्यक्त करत पक्षाला सोडचिठ्ठी देत असल्याचं जाहीर केलं आणि शिंदे गटात प्रवेश केला आहे.
सुशांतसिंग राजपूत प्रकरणातही चर्चेत (Rahul Kanal and Sushant singh Rajput death case)
राजकारणात सक्रिय असणारे राहुल कनाल हे एक उद्योजक आहेत. तसेच ते शिर्डी देवस्थान समितीवर पदाधिकारीही आहेत. अनेक कलाकार आणि क्रिकेटपटूंशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खानपासून क्रिकेटर विराट कोहलीपर्यंत अनेकांसोबत कनाल यांचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतात.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी कनाल यांच्या घरी आयकर विभागाच्या पथकाने छापेमारी केली होती, तेव्हाही ते चर्चेत आले होते. पण त्याआधी सुद्धा म्हणजेच दिशा सालियन व सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणी सुद्धा राहुल कनाल चर्चेत आले होते. भाजप आमदार नितेश राणे यांनी दिशा सालियन आणि सुशांतसिंग राजपूत मृत्यूप्रकरणाशी आदित्य ठाकरेंसह कनाल यांचा संबंध जोडला होता. याप्रकरणी पुढे काही निष्पन्न झालं नाही. त्यावेळी देखील कनाल यांनी आदित्य ठाकरेंची साथ सोडली नव्हती. मात्र आता स्वतःलाच पक्षात डावललं जात असल्याचं सांगत त्यांनी मातोश्रीची साथ सोडली आहे.
पक्ष सोडण्याचे आधीच दिले संकेत
राहुल कनाल यांनी पक्षातून बाहेर पडणं म्हणजे आदित्य ठाकरेंसाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जातोय. सत्तासंघर्षाच्या काळातही कनाल आदित्य ठाकरे व मातोश्रीशी एकनिष्ठ राहिले. कनाल आदित्य ठाकरेंची साथ सोडतील असा कोणी विचारही केला नसेल. परंतु, शनिवारी (1 जुलै) आदित्य ठाकरेंच्या ‘धडक मोर्चा’ आधीच कनाल यांनी त्यांना रामराम केला.
काहीच दिवसांपूर्वी कनाल हे युवासेना कार्यकारिणीच्या व्हॅटसऍप ग्रुपमधून बाहेर पडले होते. तेव्हापासूनच त्यांच्यात आणि पक्षात नाराजी असल्याची चर्चा होती. त्यानंतर आता थेट पक्षच सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला. आदित्य ठाकरे व आपल्यामध्ये मुद्दाम भांडणं लावली जात असल्याचा आरोपही कनाल यांनी केला आहे.
शिवसेनेच्या आमदारांना कनाल यांचा अडथळा?
खरंतर उद्धव ठाकरेंची साथ सोडणाऱ्या काही आमदारांचं असं म्हणणं होतं की आम्हाला मातोश्रीवर जाऊ दिलं जात नाही, पक्षप्रमुखांना भेटू दिलं जात नाही, याशिवाय आमच्या कामामध्ये युवासेनेचे पदाधिकारी अडथळा निर्माण करतात, हस्तक्षेप करतात. सूत्रांच्या म्हणण्यानुसार त्यामध्ये राहुल कनाल यांचंही नाव होतं. मात्र तेच कनाल आता शिंदे गटात जात असल्यामुळे शिंदे गटात असणारे आमदार त्यांच्याशी जुळवून घेणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.