मुंबई : 1999 साली शरद पवार , पीए संगमा आणि तारिक अन्वर यांनी इटालियन वंशाच्या सोनिया गांधी यांच्या पक्षाचे नेतृत्व करण्याच्या अधिकारावर मोठा वाद घातला होता. त्यामुळे त्यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना 25 मे 1999 मध्ये नवी दिल्लीत शरद पवार, पी.ए. संगमा आणि तारिक अन्वर यांनी केली होती. तिघेही, हजारो समर्थकांसह 6 क्रमांक, गुरुद्वारा रकाब गंज रोड, नवी दिल्ली येथे नवीन पक्षाची स्थापना करण्यासाठी जमले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना सोनिया गांधींच्या नेतृत्वाला विरोध करून झाली असूनही, हा पक्ष ऑक्टोबर 1999 मध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीत (यूपीए) सामील झाला आणि महाराष्ट्रात सरकार स्थापन केले.
कमी काळात राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवणारा एकमेव पक्ष
शरद पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि पी.ए. संगमा आणि तारिक अन्वर यांना पक्षाचे सरचिटणीस बनवण्यात आले. भारताच्या निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता दिली. देशाच्या इतिहासात इतक्या कमी कालावधीत राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवणारा हा एकमेव पक्ष होता.
काँग्रेस-राष्ट्रवादी निवडणूक (Congress-NCP Alliance)
1999 साली शरद पवार (NCP Leader Sharad Pawar) काँग्रेसमधून बाहेर पडले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. 1999 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकमेकांच्या विरुद्ध लढले. विशेष म्हणजे शरद पवारांनी काँग्रेसमधील अनेक आमदारांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश दिला होता. राष्ट्रवादी काँग्रेसला महाराष्ट्रात मोठे यश मिळाले. पहिल्या निवडणुकीत 1999 मध्ये राज्य विधानसभेसाठी ते तिसर्या क्रमांकावर आले आणि 223 जागांपैकी 58 जागा जिंकल्या. त्यानंतर राज्यात आघाडी सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेस पक्षाशी युती केली. काँग्रेस पक्षाने 75 जागा जिंकल्या.
त्यानंतरच्या राज्य आणि राष्ट्रीय निवडणुकांमध्ये दोन्ही पक्षांमधील युती कायम राहिली आणि राष्ट्रवादी 2004 मध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) आघाडी सरकारचा भाग बनला. भाजप-शिवसेना युतीनं 125 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेस-राष्ट्रवादीचं एकत्रित संख्याबळ 133 होतं. अपक्षांच्या मदतीनं काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीनं सत्ता स्थापन केली. विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले तर राष्ट्रवादीचे छगन भुजबळ उपमुख्यमंत्री झाले. अशाप्रकारे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीनं सत्ता स्थापन केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) मुख्यमंत्रिपद हुकले
2004 साली जागावाटपामध्ये काँग्रेसच्या वाट्याला 157 तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला 124 जागा आल्या. राष्ट्रवादी काँग्रेसनं कमी जागा लढवूनही त्यांचे 71 आमदार निवडून आले तर काँग्रेसचे 69 आमदार निवडून आले. तीन जास्त मंत्रिपदं आणि चार अधिक खाती घेतल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्यमंत्रिपद हुकले. त्यामुळे 2009 मध्ये विधानसभेसाठी जागावाटपाची बोलणी सुरू होताच राष्ट्रवादीनं निम्म्या-निम्म्या जागांची मागणी केली. 288 पैकी राष्ट्रवादी काँग्रेसनं 114 तर काँग्रेसनं 174 जागा लढवल्या. काँग्रेसनं 82 जागा जिंकल्या तर राष्ट्रवादीला 62 जागा जिंकता आल्या. या निवडणुकीत काँग्रेसच्या जागांमध्ये वाढ झाली.
2014 ला न मागता भाजपला पाठिंबा
2014 साली लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला अपयश आलं. काँग्रेसला 42 तर राष्ट्रवादीला 41 जागा जिंकता आल्या. निवडणुक निकाल लागल्यानंतर राष्ट्रवादीकडून राज्यात स्थिर सरकार आणण्यासाठी भाजपला पाठिंबा देऊ शकतो असं सांगण्यात आलं होतं. शिवसेना आणि भाजपमध्ये फूट पाडण्यासाठीची ही रणनिती असल्याचं तेव्हा बोललं जात होतं. नंतर मात्र शिवसेना सरकारमध्ये सामील झाली आणि राष्ट्रवादीला विरोधी पक्षात रहावं लागलं होतं.
2019 ला महाविकास आघाडीचा प्रयोग
2019 मध्ये शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी चा प्रयोग राज्यात करण्यात आला. यामध्ये काँग्रेस शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अशी ही महाविकास आघाडी स्थापन झाली. मात्र त्यानंतर राज्याच्या राजकारणामध्ये वेगळ्या घडामोडींना सुरुवात झाली. सुरुवातीला एकनाथ शिंदे हे आमदारांना घेऊन शिवसेनेमधून फुटून भाजप सोबत गेले. त्यामुळे महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर ज्या उद्देशाने महाविकास आघाडी स्थापन झाले होती, तो उद्देशच कुठेतरी या सर्व निर्णयामुळे डळमळीत झाला होता. राष्ट्रवादीला विधानसभेत विरोधी पक्षनेते पद मिळालं होतं. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते म्हणुन अजित पवार यांची निवड करण्यात आली होती.
2023 मध्ये पक्षात सर्वात मोठं बंड
2022 -2023 हे वर्ष राज्याच्या राजकारणात भूकंप निर्माण करणारच वर्ष म्हणाव लागेल. कारण की, 2022 मध्ये शिवसेना ही शिवसैनिकांकडूनच फोडण्यात आली आणि वेगळी चूल मांडण्यात आली. त्यानंतर पक्षावरच या फुटलेल्या गटाने दावा सांगत पक्षाचा संपूर्ण ताब्यात घेतला. त्यामुळे उरलेल्या ठाकरे गटासाठी पुन्हा आपला अस्तित्व निर्माण करण्यासाठी संघर्ष करणारच हे वर्ष ठरणार आहे आणि त्याची सुरुवात उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्याकडून झालीये. त्यानंतर आता 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याचे चित्र दिसून आलं. आता जे शिवसेनेमध्ये घडलं तेच आता राष्ट्रवादीमध्ये घडताना दिसत आहे.
अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचा जो गट शिंदे-फडणवीस यांच्यासोबत गेला आहे तो आपणच राष्ट्रवादी पक्ष असल्याचा दावा करतोय. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार राष्ट्रवादीची पुन्हा बांधणी करण्याची भाषा करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली आहे हे दिसतंच आहे पण येत्या काळात पक्षाची शिवसेनेसारखीच स्थिती होणार का? हे पाहायला मिळेल.









