कोल्हापूर शहरामध्ये सध्या तणावाचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. औरंगजेबाचे आणि टिपू सुलतानाचे उदात्तीकरण करणारे स्टेटस ठेवल्यावरुन कोल्हापुरात सध्या वाद पेटला आहे.
मंगळवारी संध्याकाळी हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली असून काही ठिकाणी याचे हिंसक पडसाद देखील उमटले आहेत.सध्या कोल्हापूर शहरातील इंटरनेट सेवा देखील बंद करण्यात आली आहे.
वाद कशामुळे निर्माण झाला?
मंगळवारी ६ जून रोजी कोल्हापुरासह राज्यभरात शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मात्र याच दिवशी काही समाजकंटकांनी त्यांच्या सोशल मिडिया अकाउंटवरुन औरंगजेबाचे फोटो स्टेटसला ठेवल्याने वाद निर्माण झाला. हिंदुत्ववादी संघटनांनी यावर आक्षेप घेत बुधवारी कोल्हापूर बंदची हाक दिली. औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी देखील करण्यात आली.
पोलीस प्रशासनाने बंद मागे घेण्याचे आवाहन केले मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर पोलिसांकडून जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला तसेच पोलीस बंदोबस्त तैनात केला गेला.
बुधवारी ७ जून रोजी कोल्हापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात हजारोंच्या संख्येने लोकं जमली. औरंगजेबाचे स्टेटस ठेवणाऱ्यांना अटक करण्याची मागणी या जमावाकडून करण्यात आली. या दरम्यान पोलीस आणि जमाव यांच्यात वाद होऊन तणाव निर्माण झाला.
यावेळी संतप्त जमावाकडून दगडफेक सुरु झाल्यानंतर त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने प्रशासनाकडून सोशल मिडियाद्वारे अफवा पसरु नयेत यासाठी इंटरनेट बंद करण्यात आले आहे.
वादग्रस्त स्टेटस ठेवल्याप्रकरणी पोलिसांनी काही जणांना अटक केली असल्याची माहिती समोर येत आहे.
“अचानक औरंगजेबाच्या औलादी पैदा झाल्या आहेत”
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात घडणाऱ्या अशा घटनांमागे कोण आहे याचा शोध घेणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
“महाराष्ट्रात काही जिल्ह्यात अचानक औरंगजेबाच्या औलादी पैदा झाल्या आहेत. जे औरंगजेबाचे फोटो दाखवतात, स्टेटस ठेवतात. ज्यामुळे तणाव निर्माण होत आहे. अचानक या औलादी कुठून पैदा झाल्या, यांचा मालक कोण आहे हे आम्ही शोधून काढू”, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली आहे.
“सत्ताधाऱ्यांनी अशा गोष्टीला प्रोत्साहित करणे योग्य नाही”
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी संवाद साधताना कोल्हापूरच्या घटनेबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
“राज्यात संगमनेर व कोल्हापूर येथे पुन्हा सामाजिक तणावाच्या घटना घडल्या. कोल्हापूर येथील आंदोलनाची बातमी टिव्हीवर पाहिली. कोणीतरी मोबाईलवर मेसेज पाठवतो. त्यावरुन लगेच रस्त्यावर उतरुन अशा घटनेला धार्मिक स्वरुप देणे योग्य नाही. सत्ताधाऱ्यांनी अशा गोष्टीला प्रोत्साहित करणे योग्य नाही. राज्यात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करणे ही राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे. पण जर राज्य सरकारच या प्रकरणात लोकांना उचकवू लागले आणि दोन समाजात, दोन जातींमध्ये कटुता निर्माण करू लागले तर हे काही चांगले लक्षण नाही”, असं ते म्हणाले.
“धर्मांध प्रवृत्तींना वेळीच चाप लावला पाहिजे”
कोल्हापुरातील तणावपूर्ण वातावरणावर संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.
“शिवशाहूंच्या कोल्हापूर नगरीमध्ये औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्या धर्मांध प्रवृत्तींना वेळीच चाप लावला पाहिजे. सरकारने दोषींवर कडक चार्जशीट दाखल करून इतकी कठोर कारवाई करावी, की परत औरंग्याचे उदात्तीकरण करण्याचे व सामाजिक सलोखा बिघडविण्याचे धाडस या राज्यात कुणाचे झाले नाही पाहिजे”, असे ट्विट त्यांनी केले आहे.