पुणे : आगामी निवडणूक वर्ष पाहता निवडणूक प्रक्रिया अधिक सहज, सुलभतेने पार पाडण्यासाठी मतदार याद्यांच्या शुद्धीकरणावर अधिकाधिक भर द्या, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित समन्वयक अधिकारी, सर्व मतदार संघांचे मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, निवडणूक मनुष्यबळ व्यवस्थापन समन्वयक अधिकारी तथा पुणे महानगर पालिकेचे उपायुक्त सचिन इथापे, स्वीप समन्वयक अधिकारी उपजिल्हाधिकारी अर्चना तांबे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, निवडणूक प्रक्रियेसाठी मतदार नोंदणी, मतदार याद्यांचे शुद्धीकरण आणि अचूकता, मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण, मनुष्यबळ व्यवस्थापन आणि सर्व घटकांचा सहभाग या बाबी सर्वाधिक महत्वाच्या आहेत. जिल्ह्यात १८ ते १९ मतदार संख्या प्रत्यक्ष लोकसंख्येपेक्षा खूप कमी आहे तसेच १९ ते २९ वयोगटातील युवा लोकसंख्या २६ लाखाच्या आसपास असून प्रत्यक्ष मतदार यादीत १३ लाख मतदार संख्या अशी मोठी तफावत आहे. या नवमतदारांची नोंदणी झाल्यास मतदानाच्या टक्केवारीमध्ये निश्चितच वाढ होईल. तसेच मतदार यादीत ८० वर्षावरील, १०० वर्षावरील मतदारांचे प्रमाणही मोठे आहे. त्यामुळे सर्व प्रक्रिया करून मयत मतदारांच्या वगळणीवर सर्व मतदार संघात लक्ष द्यावे.
मयत मतदारांच्या वगळणीसाठी आवश्यक प्रक्रिया व्यवस्थित पार पाडावी. मतदार यादीतील नाव वगळणी करताना पंचनामे, संबंधितांना नोटीस देणे आदी सर्व कार्यवाही करावी. चुकीच्या प्रकारे झालेल्या वगळणी प्रकरणात नव्याने अर्ज भरून नावनोंदणी करून घ्यावी. मतदार ओळखपत्र छपाई आणि वितरणाचे संनियंत्रण करावे व त्यासाठी पोस्टाशी समन्वय साधावा. सर्व मतदारांना वेळेत मतदान ओळखपत्र मिळेल यावर लक्ष ठेवा, असेही त्यांनी सांगितले.
सर्व मतदान केंद्रांना मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी स्वतः भेटी देऊन पडताळणी करावी. शहरामध्ये मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण करताना एकाच ठिकाणी ४ पेक्षा जास्त मतदान केंद्रे नसावेत असा प्रयत्न करावा. शहरामध्ये हजारपेक्षा जास्त मतदारसंख्या असलेल्या गृहनिर्माण संस्था असून त्याठिकाणीच मतदान केंद्रे स्थापन करता येतील, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, नवमतदारांच्या नोंदणीसाठी मतदार संघातील महाविद्यालयांमध्ये कॅम्पस दूत नेमावेत. त्यांना प्रमाणपत्रांच्या रूपाने प्रोत्साहन द्या. महिला मतदार नोंदणीसाठी ग्रामीण भागात महिला स्वयंसहाय्यता गटांची मदत घ्यावी. दिव्यांग, तृतीयपंथीय मतदारांच्या नोंदणीसाठी समाजकल्याण विभागाकडील या घटकाची संख्या, पत्ते आदी माहिती मिळवून विशेष प्रयत्न करा. शरीरविक्रय व्यवसायातील महिलांच्या नोंदणीसाठी नॅको सारख्या संस्थेमधील माहिती उपयुक्त होईल. कातकरी आदी भटक्या मतदारांच्या नोंदणीसाठीही विशेष शिबिरे आयोजित करावीत, असेही ते म्हणाले. निवडणूक कार्यवाहीला गती देण्यासाठी झोनल अधिकाऱ्यांच्या नेमणुका आत्ताच कराव्यात, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.