सोलापूर : सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील वातावरण प्रचंड तापले आहे. अशातच आता धनगर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत येण्याची शक्यता आहे. कारण, सोलापूरमध्ये धनगर आरक्षण कृती समितीच्या एका कार्यकर्त्याने पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अंगावर भंडारा उधळला आहे. शंकर बंगाळे असे या धनगर आरक्षण कृती समितीच्या कार्यकर्त्याचे नाव आहे.
शुक्रवारी सकाळी शंकर बंगाळे सोलापूरच्या विश्रामगृहावर विखे-पाटलांची भेट घेण्यासाठी आला. आपल्याला विखे-पाटील यांच्याकडे धनगर आरक्षणाचे निवेदन द्यायचे असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलिसांनी शंकर बंगाळे याला विखे-पाटलांना भेटून देण्याची परवानगी दिली. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी ठरल्याप्रमाणे शंकर बंगाळे यांच्याकडून निवेदन स्वीकारले. त्यानंतर विखे- पाटील हे निवेदन वाचत असताना शंकर बंगाळे याने खिशातून भंडाऱ्याने भरलेला रुमाल काढला आणि तो सरळ विखे-पाटलांच्या डोक्यावर रिता केला. यावेळी त्याच्यासोबतच्या सहकाऱ्यांनी ‘यळकोट यळकोट जय मल्हार’च्या घोषणा दिल्या. यावेळी विखे-पाटलांच्या डोक्यावर सर्वत्र भंडारा पसरला होता.