पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सध्या वाहनांची मोठी संख्या पाहता वायुप्रदुषण आणि ध्वनीप्रदुषाणात देखील वाढ झाली आहे. दिल्ली आणि मुंबईमध्ये वायू प्रदूषणामुळे नागरिकांचे श्वास कोंडले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी अनोखी शक्कल लढविली आहे. पिंपरी-चिंचवडमध्य़े दर सोमवारी आता नो हॉर्न डे उपक्रम राबवण्यात येणार आहे.
या उपक्रमांतर्गत सोमवारी कोणत्याही वाहनचालकाने हॉर्न वाजवू नये, यासाठी वाहतूक पोलीस शाळा, कॉलेज, आय टी इंडस्ट्री, एमआयडीसीमध्ये जाऊन नो हॉर्न डे संदर्भात जनजागृती करणार आहेत. वाहतूक पोलिसांकडून हा उपक्रम राबवला जाणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यातील काही परिसरात तर कायम वाहतूक कोंडी असते. वाहतचूक कोंडी झाल्याने अनेकजण मोठ मोठ्याने हॉर्न वाजवतात. त्यामुळे अनेक नागरिकांना आणि त्या परिसरात राहणाऱ्या रहिवाश्यांना त्रास होतो.
ध्वनिप्रदूषणामुळे अनेकांना कानाचे आजार तसेच मानसिक विकार बळावतो आहे. याबाबत प्रादेशिक परिवहन कार्यालय, सामाजिक संस्था तसेच वाहतूक संस्थांकडून वारंवार जनजागृती करण्यात आली आहे. मात्र वाहनचालक याकडे नेहमीच दुर्लक्ष करतात. त्यामुळे शहरात वाहतूक कोंडी होणाऱ्या अनेक ठिकाणी सातत्याने ध्वनिप्रदूषण होताना दिसते. यावर उपाय म्हणून प्राथमिक स्वरूपात दर सोमवारी वाहनचालकांनी नो हॉर्न डे पाळावा, असा निर्णय शहर वाहतूक पोलिसांनी घेतला आहे.