पुणे : विवाहाची मिरवणूक निघालेली…फेटे बांधलेले वराती लग्नासाठी निघालेले…सनईच्या स्वरात सर्वांचे मंडपात दिलखुलास स्वागत… आणि लग्नघटीका समिप आली असताना वर-वधूंनी नवजीवनात प्रवेश करताना पहिले पाऊल मतदानाचा संकल्प करून टाकले. त्यांनी इतरांनाही मतदान करण्याचे आवाहन केले.
विवाहात ज्येष्ठांनी आशीर्वाद देतानाच थोरा मोठ्यांचा मान ठेवण्याचा, सामाजिक जबाबदारी पार पाडण्याचा संदेश दिला. त्याचे पालन करण्याचा निश्चय करतानाच देशाविषयीचे कर्तव्य म्हणून मतदान करणार असल्याचे सांगितले. नव्या संसाराची सुरुवात येत्या लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याचा संकल्प करुन नवविवाहीत जोडण्याने करुन एक मोठा सामाजिक संदेश समाजाला दिला.
आंबगेाव तालुक्यातील जवळे गावात अक्षय लोखंडे आणि उत्कर्षा घोडेकर यांच्या विवाहाची तयारी सुरू कसताना नवरदेवाची स्वारीही आली. अशात स्वीप पथकाच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या मतदान जनजागृती फेरीतील विद्यार्थ्यांनी वऱ्हाडी मंडळीला मतदानाचे आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत सर्वांनी मतदान करण्याची प्रतिज्ञा घेतली.
शिरुर लोकसभा मतदार संघाअंतर्गत आंबेगाव विधानसभा मतदार संघातील स्वीप पथक मतदार संघात ठिकठिकाणी मतदान जनजागृती करत आहे. जवळे गावात विवाहाच्या मिरवणुकीत मतदार जनजागृती करून वर-वधू आणि वऱ्हाडी मंडळींना मतदानाचा संकल्प करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी सर्वांनी मतदान संकल्प पत्र भरू दिले. या उपक्रमात स्वीप सदस्य नारायण गोरे, तुषार शिंदे, सुनिल भेके, सचिन तोडकर यांच्यासह जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.