Ajit Pawar vs Shinde Shivsena : गेल्या वर्षी राज्यात झालेल्या ऐतिहासिक बंडानंतर आता पुन्हा एकदा नवं बंड झालं आहे. शिवसेनेत शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन गट पडले. या बंडाला एक वर्ष पूर्ण होत नाहीत तोच महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप झाला. आता फरक केवळ इतकाच आहे की हे बंड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झालं. राज्यात आता तीन पक्षांचं सरकार निर्माण झालं आहे. यामुळे राष्ट्रवादीमध्ये तर फूट पडलीच, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेची सुद्धा कोंडी झाली आहे. ती कशी हे या लेखातून समजून घेऊयात.
शिवसेनेत दोन गट पडून नुकतंच एक वर्ष झालं आणि पुन्हा महाराष्ट्राला नवा राजकीय धक्का बसला. राज्याचे विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी ‘भाकरी फिरवली’. अजित पवार एकटेच गेले नाहीत तर आपल्यासोबत 40 आमदारांचा पाठिंबा असल्याचंही सांगण्यात येतंय. मात्र, ते पक्षातून बाहेर गेले नाहीत, तर राष्ट्रवादी पक्ष म्हणूनच त्यांनी शिंदे-भाजप सरकारला पाठिंबा दर्शवला. त्यामुळे राष्ट्रवादीत सुद्धा सरळसरळ दोन गट पडले आहेत. आता शिंदे-भाजप सरकारसोबत राष्ट्रवादी सत्तेत सहभागी झाली असली तर यामुळे शिंदेंच्या शिवसेनेची गोची झाल्याचे दिसून येत आहे.
अजित पवारांच्या शपथविधी वेळी देखील मुख्यमंत्री शिंदे नाराज असल्याची चर्चा सुरू झाली. साहजिकच आहे, ज्या “राष्ट्रवादी काँग्रेससोबत आम्हाला मांडीला मांडी लावून बसायचं नाही”, असं ठामपणे सांगणाऱ्या शिंदे गटाला आता त्याच राष्ट्रवादीसोबत ऍडजस्ट करावं लागणार आहे. त्यामुळे शिंदे, भाजप आणि राष्ट्रवादी हे नवीन समीकरण नक्की कसं असणार याची उत्सुकता अनेकांना आहे.
शिंदे गट व राष्ट्रवादीतील मतभेदांचं काय?
खरंतर शिंदे गटाने ज्यावेळी बंड केलं, तेव्हा त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत युती करणं हे शिवसेनेच्या तत्त्वात नसल्याचं प्रमुख कारण सांगितलं होतं. त्यातही राष्ट्रवादीचे नेते आमच्या मतदारसंघात अरेरावी करतात, अशी तक्रार देखील होती. याशिवाय अजितदादा हे अर्थमंत्री असून आम्हाला निधी दिला जात नाही, आमची कामे पूर्ण केली जात नाहीत, राष्ट्रवादी शिवसेनेवर अन्याय करते, अशा अनेक तक्रारी बंड झाल्यानंतर शिवसेनेतल्या अनेक आमदारांनी केल्या होत्या. राष्ट्रवादीला कंटाळून आम्ही उठाव केला, असं शिंदे गटाने वारंवार म्हंटलं.
मात्र आता त्याच अजितदादा आणि राष्ट्रवादीसोबत शिंदे गटाला राहावं लागणार आहे. त्यामुळे बंडावेळी दिलेली कारणांचं आता काय होणार? जनतेला कसं सामोरं जाणार? आणि आता पुन्हा मतदारसंघातील वाटाघाटी, असे अनेक प्रश्न शिंदे गटासमोर निर्माण झाली आहेत. यामुळे मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांचा पक्ष नाराज असल्याचं सांगण्यात येत आहे.
शिंदे गटातील कोणत्या नेत्यांना राष्ट्रवादीची अडचण?
एकनाथ शिंदे
शिवसेनेतील बंडाच्या सुरुवातीपासूनच एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी आणि अजित पवारांविषयीची आपली नाराजी अनेकदा व्यक्त केली आहे. अजितदादा शिवसेनेच्या आमदारांना निधी देत नाहीत, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हंटलं होतं. यासह विधानभवनात देखील शिंदे आणि अजित पवारांमध्ये अनेकदा वार-पलटवार पाहायला मिळाले.
गुलाबराव पाटील
राष्ट्रवादीने एकदा नाही तर तीन वेळा आमचा पक्ष फोडला, असा हल्लाबोल गुलाबराव पाटलांनी शिवसेनेतल्या बंडानंतर केला होता. राष्ट्रवादीने शिवसेनेचं नुकसान केलं असून त्यांच्यासोबत मांडीला मांडी लावून बसणं हे मान्य नसल्याचं मत पाटलांनी व्यक्त केलं होतं.
तानाजी सावंत
महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवसेना आमदारांच्या मतदारसंघात राष्ट्रवादीला बळ देण्याचं काम सुरू आहे, अशी टीका त्यावेळी तानाजी सावंत यांनी केली होती. अर्थ खाते राष्ट्रवादीकडे असल्याने शिवसेनच्या आमदारांची कामे पूर्ण होत नाहीत. इतकंच नाही तर मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंनी शिवसेना राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली, असा घणाघातही सावंत यांनी केला होता.
रामदास कदम
दोनच महिन्यांपूर्वी रामदास कदम यांनी अजित पवारांवर थेट टीका केली होती. अजित पवारांनीच शिवसेनेसोबत गद्दारी केली, राष्ट्रवादीच्या आमदारांना जास्त निधी दिला जायचा. त्यांच्यामुळेच शिवसेनेचे आमदार फुटले, असा आरोप कदम यांनी केला. तसंच याआधीही कदम यांनी शिवसेना फोडण्यामागे शरद पवार व अजित पवारांना जबाबदार ठरवलं होतं.
संदीपान भुमरे
राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांसोबत काम करणं कठीण असल्याचं वक्तव्य संदीपान भुमरे यांनी केलं होतं. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडून प्रस्ताव व कामांना मंजुरी मिळत नसल्याचंही त्यांनी सांगितलं होतं.
शहाजी बापू पाटील
राष्ट्रवादीने सर्व निधी, योजना आणि कामे पळवली, अशी टीका शहाजी बापूंनी जळगावातील एका जाहीर सभेत केली होती. शिवाय यावेळी शहाजी बापूंनी अजित पवारांवरही एकेरी भाषेत टीका केली होती.
मनिषा कायंदे
नुकत्याच ठाकरे गटातून बाहेर पडलेल्या आमदार मनिषा कायंदे यांनी देखील शिंदे गटात येताच राष्ट्रवादीवर बाण सोडला. राष्ट्रवादी, काँग्रेस यांचा अजेंडा चालवणारी शिवसेना असूच शकत नाही, असं म्हणत कायंदेंनी ठाकरेंवर निशाणा साधला.
भाजपची डोकेदुखी वाढणार?
शिंदे गट आणि भाजप सत्तेत आल्यानंतरही शिंदे गटातल्या बहुतांश नेत्यांनी आपल्या भाषणातून, पत्रकार परिषदेतून किंवा जाहीर सभेतून देखील राष्ट्रवादी पक्षावर ताशेरे ओढले होते. इतकंच काय तर स्वतः मुख्यमंत्र्यांनी सुद्धा विधानभवनात अजित पवारांसमोरच आपली अडीच वर्षातली नाराजी बोलावून दाखवली होती. शिंदे गटाने राष्ट्रवादीवर हल्लाबोल करण्याची एकही संधी सोडली नव्हती.
मात्र आता त्याच राष्ट्रवादीसोबत सत्तेत सहभागी होणं हे शिंदे गटाला फारसं आवडलेलं नाही. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात असणारं राजकीय वैर भाजपला मिटवता येईल का हा एक मोठा प्रश्नच आहे. तसंच शिंदे गटातले अनेकजण मंत्रिपदासाठी इच्छुक असताना आता त्यात राष्ट्रवादीची भर पडली आहे. या सर्वामुळे शिवसेनेनंतर राष्ट्रवादी फोडण्यात जरी भाजपला पुन्हा यश मिळालं असलं तरी भाजपला शिंदे गटाची नाराजी दूर करता येणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल.