अहमदनगर : औरंगाबाद जिल्ह्याचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव धाराशिव करण्याच्या निर्णयानंतर आता अहमदनगर जिल्ह्याचे नाव ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे अहमदनगर जिल्ह्याचे नाव ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ करण्याचा महापालिकेचा ठराव देखील घेण्यात आला आहे. अहमदनगर महापालिका प्रशासक सर्वसाधारण सभेकडून नामांतर प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. हा प्रस्ताव आता शासनाकडे पाठवला जाणार आहे.
अहमदनगर शहराला मोठा ऐतिहासिक वारसा आहे. महाराष्ट्राचा हा सर्वात मोठा जिल्हा आहे. गेली अनेक वर्षांपासून अहमदनगर शहराचे नाव बदलले जावे अशी मागणी होते आहे. आता लवकरच अहमदनगर शहरचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर होणार अशी चिन्हे आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडून नामांतराचा ठराव पाठविण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांना आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी तातडीने अधिकाऱ्यांची महासभा घेतली. सध्या महानगरपालिकेत प्रशासक असून, अतिरिक्त्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे, उपायुक्त सचिन बांगर, शहर अभियंता मनोज पारखे, आस्थापना प्रमुख मेहेर लहारे यांच्या उपस्थित महासभा झाली. महासभेत अहमदनगरचे ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर’ असे नामांतर करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. हा ठराव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला पाठवला जाणार आहे. त्यानंतर राज्य व केंद्र याबाबत निर्णय घेतील.