हल्ली लोकांना व्यस्त जीवनशैलीमुळे अनेक आजारांना तोंड द्यावे लागते. मधुमेह(Diabetes) हा असा आजार आहे, त्यावर मात करण्यासाठी रुग्णाने आपल्या दैनंदिन जीवनशैलीवर आणि आहारावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. या आजारात रुग्णाने खाण्यापिण्याची काळजी घेतली नाही तर त्याच्या रक्तातील साखरेची पातळी वाढते. रक्तातील साखरेची अधिक वाढ रुग्णासाठी घातक ठरू शकते. भारतात मात्र अशा रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसत आहे. एका अहवालानूसार देशात १० कोटीपेक्षा जास्त जणांना मधुमेह असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. (Diabetes in India)
भारतातील 100 दशलक्ष लोक मधुमेहाने ग्रस्त
भारतातील 100 दशलक्ष लोक मधुमेह आणि 310 दशलक्ष उच्च रक्तदाबाने ग्रस्त आहेत. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (ICMR) सहकार्याने मद्रास डायबेटिस रिसर्च फाउंडेशनने अभ्यास केला आहे. भारतातील 28.6 टक्के लोक सामान्य लठ्ठपणाने ग्रस्त आहेत, तर 39.5 टक्के लोक पोटातील लठ्ठपणाने ग्रस्त आहेत. 2017 मध्ये भारतातील सुमारे 7.5 टक्के लोकांना मधुमेह असल्याचे या अभ्यासात आढळून आले आहे.
भारतात, 11.4 टक्के लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत आणि 35.5 टक्के लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, तर 15.3 टक्के लोक मधुमेहपूर्व स्थितीत आहेत. The Lancet Diabetes & Endocrinology या मासिकात प्रकाशित झालेल्या अभ्यासात हे समोर आले आहे. देशातील मधुमेह आणि असंसर्गजन्य रोगावरील सर्वात मोठ्या अभ्यासाचा अंदाज आहे की, 2021 मध्ये भारतात 101 दशलक्ष लोक मधुमेही होते, तर 136 दशलक्ष प्री-डायबेटिक होते. तसेच 315 दशलक्ष लोक उच्च रक्तदाबाने ग्रस्त होते.
मधुमेहाची लक्षणे
मधुमेह हा असा आजार आहे, ज्यावर कोणताही इलाज नाही आणि त्याला नियंत्रणात ठेवूनच चांगले आयुष्य जगता येते. रक्तातील साखरेची पातळी जास्त असल्याने मधुमेहाच्या रुग्णांना जास्त तहान लागणे, वारंवार लघवी करणे, थकवा, अंधुक दृष्टी, नकळत वजन कमी होणे इत्यादी समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
उच्च रक्तदाबाची लक्षणे
उच्च रक्तदाब हा विकार हळूहळू वाढत जाणारा आहे. या विकारात चालल्यावर दम लागणे, छातीत धडधड, डोकेदुखी, दृष्टिदोष, एकदम उभे राहिल्यास किंवा एकदम खाली बसल्यास चक्कर आल्यासारखे वाटते, पायावर आणि चेहऱ्यावर सूज येणे अशी ही लक्षणे दिसून येतात.
अशी काळजी घ्या :
१. नियमित व्यायाम करा.
२. कमी चरबी आणि कमी कॅलरीज असलेला आहार घ्या.
३. जास्त साखर किंवा तळलेले पदार्थ टाळा.
४. पुरेशा भाज्या, फळे आणि अधिक फायबर असलेले पौष्टिक अन्न खायला हवे.
५. नियमित चालणे, पोहणे, योगासने इत्यादीद्वारे शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहा.
६. चांगली झोप घ्या.
७. धूम्रपान सोडणे तसेच अल्कोहोल आणि कॅफिनचे सेवन नियंत्रित करा.
८. शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवा.