भारतातील सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी आणि दिवाळी म्हंटले की जितकी मज्जा-मस्ती तितकाच खर्च.खर म्हणजे वर्षातून एकदाच येणारा दिवाळी हा सण ज्या महिन्यात असतो त्या महिन्यात नवी खरेदी करताना प्रत्येक जण आपला हात जरा सैल सोडत असतो आणि त्यासाठी असणाऱ्या बजेटचे आर्थिक गणित जुळते त्या महिन्याच्या पगारासोबत मिळणाऱ्या दिवाळी बोनस मुळे.त्यामुळे छोटी का होईना पण मिळणारी बोनस रक्कम ही दिवाळीच्या महिन्यात सगळ्यांची तारणहार ठरते.पण हा दिवाळी बोनस प्रकार नक्की सुरु कसा झाला हे तुम्हाला माहित आहे का? तर दिवाळी बोनस ही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सर्वासाठी दिलेल्या लढ्याचे फलित आहे. याच दिवाळी बोनसचा इतिहास आज आपण घेऊ
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशातील कामगार वर्गाला दिलेली एक देण म्हणजे दिवाळी बोनस परंतु बाबासाहेबांनी यासाठी दिलेल्या लढ्याआधीची परिस्थिती ही वेगळी होती.तर त्यावेळी ब्रिटिश काळात भारतातील कामगारांना एखाद्या जनावराप्रमाणे राबविले जायचे व अक्षरक्षा १२ ते १६ तास कामगारांना काम करावे लागत असे आणि इतके तास काम करूनही भारतीय कामगारांना योग्य ती वागणूक मिळत नव्हती तसेच कामाचा योग्य मोबदला सुध्दा दिला जात नव्हता.आणि याच उद्दात हेतुतून बाबासाहेबांनी कामगारांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी १९३६ साली स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली व कामगारांचे नेमके काय प्रश्न आहेत याची जाणीव या पक्षाच्या माध्यमातून बाबासाहेबानी देशाला करून दिली आणि त्यावर उपाय म्हणून कामगार विषयक धोरणांना प्रोत्साहन दिले.खर म्हणजे ब्रिटिश भारतात येण्यापूर्वी कामगार जगतात मालकाकडून कामगारांना प्रत्येक आठवड्याला पगार देण्याची पद्धत होती, पण जेव्हा ब्रिटिश भारतात आले तेव्हा त्यांनी इंग्रजी महिन्याप्रमाणे पगार देण्याची पद्धत सुरू केली त्यामुळे कामगार वर्गाचे आर्थिक नुकसान होऊ लागले कारण.त्यावेळी आठवड्याच्या पगारपद्धती नुसार एका वर्षात असणाऱ्या 52 आठवड्यांचे प्रत्येकाला 52 पगार मिळत होते. म्हणजेच जर 4 आठवड्याचा 1 महिना धरला तर त्यावेळी वर्षात 13 पगार मिळायचे.परंतु ब्रिटिशांनी एका महिन्याला पगार देण्यास सुरुवात केल्याने 12 महिन्याचे 12 पगार मिळायला लागले म्हणजेच आता ५२ ऐवजी ४८ आठवड्यांचा पगार कर्मचाऱ्यांना मिळू लागला होता.त्यामुळे एका महिन्याचा पगाराचे आर्थिक नुकसान कामगार वर्गाचे होत होते.आणि ही बाब जेव्हा बाबासाहेबांच्या लक्षात आली तेव्हा 13 वा पगार मिळण्या करीता बाबासाहेबांनी तत्कालीन ब्रिटिश सरकारला पत्र लिहून कळविले आणि कामगारांना त्याच्या कामाच्या हक्काचे पैसे न मिळाल्यास निर्देशन करू असा इशारा दिला.
तसेच सप्टेंबर १९३८ च्या ट्रेड डिस्प्युट बिलाच्या संदर्भात कौन्सिलमध्ये बाबासाहेबानी कामगाराचा अधिकार आणि मालकाने लादलेली बंधने याचा कडाडून विरोध केला यामध्ये कामगारवर्गाच्या हितासाठी नोकरी,बडतर्फी व पगारवाढ यावर सरकारी नियंत्रण असावे,तसेच कामाच्या तासांवरील मर्यादा, योग्य वेतन,भरपगारी रजा तसेच बोनस, निर्वाह वेतन यासंबंधीचे कायदे करावे असे ठणकावून सांगितले.त्यामुळे ब्रिटिश सरकारने आंबेडकरांच्या या पत्राची तात्काळ दखल घेतली आणि कामगारांना 13 वा पगार कसा देता येईल यावर विचार करण्यास सुरुवात केली,त्यावेळी बाबासाहेबांनी ब्रिटिश सरकारला काही महत्वाच्या सूचना केल्या व त्यात ब्रिटिशांना असे सुचवले की भारतीय संस्कृती नुसार दिवाळी हा वर्षभरातील सर्वात मोठा सण आहे त्यामुळे या सणाच्या अगोदर हा १३ वा पगार बोनस म्हणून कामगारांना द्यावा असे बाबासाहेबांनी त्यावेळी सांगितले.आणि 30 जून 1940 साली बोनस द्यायचा कायदा लागू झाला या कायद्यामुळे भारतातील कामगार चळवळीला अनेक अधिकार मिळाले आणि बाबसाहेब आंबेडकरांच्या रूपाने लढण्यासाठी आवाज मिळाला आणि त्यामुळे कामगार चळवळी खरी नवसंजीवनी मिळाली.
खरतर बाबासाहेबांनी फक्त दलितोद्धाराचेच कार्य केले असे नाही तर समाजातील प्रत्येक जाती,धर्मातील शोषित वर्गासाठी काम केले मग तो कोणीही असो आणि त्यामुळेच आज आपल्याला मिळणार १३ वा पगार हा बोनस म्हणून येतो तो बाबासाहेबांच्या परिश्रमांमुळे.पूढे १९४७ सालीभारत स्वतंत्र झाल्यानंतर बाबासाहेब देशाचे कायदेमंत्री झाले व तेव्हाही त्यांनी कामगारांच्या कल्याणासाठी औद्योगिक कलह कायदा,कारखाना कायदा, कर्मचारी राज्य विमा कायदा,किमान वेतन कायदा असे अनेक कायदे बनवले आणि आजही या कायदे कामगारांच्या, कर्मचाऱ्यांच्या हक्काचे सुरक्षितपणे रक्षण करत आहेत.









