गाझियाबाद : गाजियाबाद मधून एक मोठी घटना उघडकीस आली आहे. देवदर्शनापूर्वी अनेक ठिकाणी पवित्र नदीमध्ये स्नान केले जाते आणि त्यानंतरच दर्शनासाठी जाता येते. मिनी हरिद्वार अर्थात गाजियाबादमध्ये दर्शनासाठी एक महिला स्नान करून कपडे बदलण्यासाठी म्हणून चेंजिंग रूममध्ये गेली आणि त्या ठिकाणी तिने जे पाहिलं ते पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली.
ही महिला आपल्या मुलीसह देवाचे दर्शन घेण्यासाठी म्हणून गाझियाबादमध्ये असलेल्या शनी मंदिरामध्ये गेली होती. या ठिकाणी गंगा घाटावर स्नान केल्यानंतर त्या दोघी महिलांसाठी असलेल्या चेंजिंग रूमकडे गेल्या. येथे कॅमेरा बसवण्यात आल्याचं तिच्या लक्षात आलं आणि तिने संताप व्यक्त केला.
दरम्यान या कॅमेऱ्याचे थेट प्रक्षेपण हे महंतांच्या मोबाईलवर केले जाते हे तिला समजले. तिने जाब विचारला असता तिलाच अश्लील शिवीगाळ आणि तक्रार केल्यास तुला महागात पडेल अशी धमकी देखील देण्यात आली.
या महिलेने तरीही न घाबरता पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी अधिक तपास केला असता माकडानं हा कॅमेरा फिरवला आणि त्याचा थेट फोकस हा महिलांच्या चेंजिंग रूमकडे चुकून गेला असं कारण चक्क महंतांनी दिलं. या प्रकरणी आता पोलीस अधिक तपास करत आहेत. परंतु एकंदरीतच मॉल, हॉटेल रूम हेच केवळ महिलांसाठी असुरक्षित नसून आता परमेश्वराचे घर देखील असुरक्षित असल्याचं चित्र पाहायला मिळतंय.










