अकोला : सध्या बारावीच्या HSC परीक्षा सुरू आहेत. परीक्षेमध्ये आत्तापर्यंत तुम्ही कॉपी बहाद्दर कशाकशा युक्त्या करून कॉपी करतात पाहिलं असेल आणि केलंही असेल. विनोदाचा भाग बाजूला ठेवून आजची ही बातमी पूर्ण नक्की वाचा. कारण तुम्ही कितीही कॉपी बहाद्दर आज पर्यंत पाहिले असतील असा कॉपी बहाद्दर कधीच पाहिला नसेल.
तर झालं असं की, लातूर जिल्ह्यातील पातुर शहरातल्या शाहबाबू उर्दू हायस्कूलमध्ये बारावीच्या परीक्षा केंद्रावर एका विद्यार्थिनीची पेपर लिहिण्याची लगबग सुरू होती. अशातच पोलिसांचा खाकी गणवेश घालून एक पोलीस या मुलीला कॉफी पुरवण्यासाठी आला. तेवढ्यात जवळच्या पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर शेळके हे आपल्या ताफ्यासह या परीक्षा केंद्रावर पोहोचले आणि या पोलिसाने पोलीस निरीक्षकांना पाहताच सॅल्यूट देखील ठोकला आणि नेमकं तिथेच अडकला…
पोलीस निरीक्षक किशोर शेळके यांनी त्याचा सल्यूट पाहून त्याला हा तोतया पोलीस असल्याचं ओळखलं. त्याने घातलेला गणवेश आणि त्यावरील नेमप्लेट फर्जी असल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि हा भामटा अडकला. बर आता या मुलीला कॉपी देण्यासाठी जो फेक पोलीस गेला होता तो दुसरा तिसरा कोणी नसून या मुलीचा भाऊच होता. अनुपम खंडारे वय वर्ष 24 असं या तोतया पोलिसाचं नाव आहे. या भावाला आणि तोतया पोलिसाला आता अधिक चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.