छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधील एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साजापूर क्रांतीनगर येथील सामाजिक कार्यकर्ता तथा लघुउद्योजक याच्या डोक्यात गोळ्या घालून त्याची हत्या करण्यात आल्याची घटना आज सायंकाळी साजापूर परिसरात घडली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना आज दि १७ रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत मृत्युमुखी पडलेला सचिन साहेबराव नरोडे वय ३८ असे व्यक्तीचे नाव आहे. साजापूर बालाजी नगर येथे नरोडे यांच्या घराच्या बाजूला मोकळ्या जागेत पाण्याच्या पाइपलाईनचे काम सुरु होते, ते
कामाची पाहणी करत होते. लाईट नसल्याने अंधाराचा फायदा घेत सचिन नरोडे यांच्या डोक्यात अज्ञात व्यक्तीकडून गोळी घालून त्यांच्यावर सूडाच्या उद्देशाने हल्ला केला. यामध्ये ते जागीच मृत्युमुखी पडले आहेत.
या घटनेची माहिती मिळताच छत्रपती संभाजीनगरचे पोलिस आयुक्त मनोज लोहिया, उपयुक्त नितीन बगाटे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदिप गुरमे, वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णचंद्रा शिंदे, उपनिरीक्षक संदीप शिंदे, प्रविण पाथरकर, अशोक इंगोले, यांचासह पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील कारवाई करण्यासाठी मृतदेह घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.
वाळू तस्करीच्या तक्रारीतून हत्या ?
सचिन नरोडे हे सामाजिक कार्यकर्ता होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी वाळू तस्करीच्या विरोधात तक्रारी करत केली होती. हि तक्रारी केल्यामुळे सचिन यांची हत्या झाल्याची जोरदार चर्चा परिसरातील नागरिकांमध्ये होत आहे.
यापूर्वीही सचिनवर हल्ला झाला होता
वाळू तस्करांच्या विरोधात सचिनने यापूर्वी तक्रारी केल्यामुळे सचिनवर हल्ला झाला होता. यामध्ये सचिनची चार चाकी गाडी पूर्णपणे जाळून टाकण्यात आली होती. त्यावेळी सचिन वाहनात नसल्यामुळे त्याचा जीव वाचला होता. मात्र यावेळी हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यात गोळ्या घातल्यामुळे ते जागीच गतप्राण झाले आहे.
आचारसंहिता जाहीर होताच खुनाचे सत्र सुरू
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होताच सामाजिक कार्यकर्त्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. आचारसंहिता सुरू होताच पहिला खून झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस प्रशासनाकडून योग्य ती पावलं उचलत नागरिकांना त्यांच्या जीवाची हमी देण्याचे काम पोलीस प्रशासनाने करावे अशी दबक्या आवाजात नागरिकांमध्ये चर्चा होत आहे.