वीज चोरीच्या प्रकरणांमुळे वीजहानी बरोबरच आर्थिक नुकसानही सोसावे लागत असल्याने या प्रकारास आळा घालण्यासाठी ‘महावितरण’ने ‘वीजचोरी कळवा आणि 10 टक्के रक्कमेचे घसघसीत बक्षीस मिळवा’, असा उपक्रम हाती घेतला आहे, या उपक्रमाला राज्यात मोठ्या प्रमाणात प्रतिसादही मिळत आहे.
भारतीय विद्युत कायदा 2003 च्या कलम 135 अन्वये वीजमीटरमध्ये जाणीवपूर्वक फेरफार करून होणाऱ्या वीजचोऱ्यांची माहिती असणाऱ्यांनी पुढाकार घेत यासंबंधी माहिती द्यावी, माहिती कळविणाऱ्याचे नाव गुप्त ठेवल्या जाईल, असे महावितरणतर्फे कळविण्यात आले आहे.
आपल्या कार्यक्षेत्राबाहेरील वीजचोरी कळवणाऱ्या ‘महावितरण’च्या कर्मचाऱ्यांनाही ही बक्षीस योजना लागू असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. पूर्वी वीजचोरीची माहिती कळवल्यानंतर एक हजार रुपयांचे बक्षीस होते. मग ती वीजचोरी लाखो रुपयांची का असेना. त्यामुळे साहजिकच हवा तितका प्रतिसाद नसल्याने आता वीजचोरीची माहिती कळवणाऱ्या नागरिकास वीजचोरीच्या अनुमानित रकमेच्या 10 टक्के रक्कम बक्षीस देण्याचा निर्णय ‘महावितरण’ने घेतला आहे.