अहमदनगर ( पारनेर ) : अहमदनगरमधून Ahmednagar एक मोठी घटना उघडकीस आली आहे. नुकताच लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये जायंट किलर ठरलेले खासदार निलेश लंके MP Nilesh Lankay यांचे समर्थक राहुल झावरे Rahul Jhavre यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यामध्ये ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्या गाडीची देखील मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खासदार निलेश लंके यांचे समर्थक राहुल झावरे हे त्यांच्या गाडीमध्ये पारनेर बस स्थानकाजवळ उभे होते. यावेळी त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला या घटनेमध्ये त्यांच्या गाडीचा देखील मोठ्या नुकसान झालं असून ते स्वतः देखील गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच क्षणी लंके यांचे सर्व समर्थक या ठिकाणी दाखल झाले आहेत. सध्या अहमदनगर शहरातील एका खाजगी रुग्णालयात राहुल झावरे यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील या घटनेबाबत संताप व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट करून म्हंटले आहे की, महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेची स्थिती कशी आहे हे सांगणारी ही घटना आहे. गृह खात्याने या घटनेची तातडीने दखल घ्यावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
या घटनेनंतर पारनेर परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. नेमका हा हल्ला कोणी केला हे मात्र अद्याप स्पष्टपणे समजू शकलेलं नाही.