अहमदनगर : जिल्ह्यातील शिर्डी मधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिर्डी मतदारसंघातील लोणी गावामध्ये काँग्रेस पक्षाच्या शिर्डी शहराध्यक्ष सचिन चौगुले यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यामध्ये सचिन चौगुले आणि त्यांच्यासोबत असलेले सुरेश आरणे हे गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, मंगळवारी रात्री संगमनेर तालुक्यातील आश्वी गावामध्ये शरद पवार यांच्या एका कार्यक्रमासाठी काँग्रेस पक्ष शहराध्यक्ष सचिन चौगुले हे उपस्थित होते. दरम्यान या कार्यक्रमावरून ते सुरेश आणणे यांच्यासोबत घरी परत येत असताना लोणी गावाजवळ दहा ते बारा जणांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये सुरेश आरने हे गंभीर जखमी झाले असून दोघांवर सध्या संगमनेर तालुक्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान घटनेचे गांभीर्य पाहता पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हलवली आहेत. आरोपींचा शोध सुरू असून राजकीय वर्तुळात देखील खळबळ उडाली आहे.
बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला संताप
दरम्यान स्वतः आ. बाळासाहेब थोरात यांनी रुग्णालयात जाऊन सचिन चौगुले यांची भेट घेतली आहे. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करून या घटनेबाबत त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले की हल्ल्याची घटनाही दहशतवादी कृत्य असून विरोधकांचा आवाज बंद करण्याचा हा प्रयत्न आहे पोलिसांनी निपक्षपातीपणे कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील आ. बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.