पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील तळेगाव दाभाडेमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दरम्यान चोरी करताना हटकल्यामुळे राग येऊन चोरट्यांनी पोलीस उपनिरीक्षकांच्या देखतच गोळीबार केला आणि पसार झाले आहेत.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, तळेगाव दाभाडेमध्ये दुपारी चारच्या दरम्यान लिंब फाट्या जवळील कॉलनीत पोलीस उपनिरीक्षक शाम शिंदे यांच्या घराचे बांधकाम सुरू असून आपल्या घराच्या बांधकामाच्या पाहणीसाठी ते गेले होते. यावेळी कॉलनीतील एका बंगल्या बाहेर एक संशयित त्यांना दिसून आला. पोलीस उपनिरीक्षक शाम शिंदे यांनी या व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद वाटल्यामुळे त्याला जाऊन हटकले. तू कोण आहेस येथे कशासाठी आलास ? असं विचारलं असता या आरोपीने ‘ ए चल तू तेरा काम कर, में अलग टाईप का इंसान हु ! ” असं म्हणाला. यावेळी श्याम शिंदे यांनी आरोपीला विचारणा सुरू ठेवल्यामुळे राग येऊन त्याने खिशातील पिस्तूल बाहेर काढलं. पिस्तूल पाहून पोलीस उपनिरीक्षक यांनी आरडाओरडा केला. चोर आले चोर आले ! त्यांचा आवाज ऐकून कॉलनीतील इतर लोक देखील बाहेर आले. यावेळी बंगल्यात चोरीच्या उद्देशाने शिरलेला आणखीन एक चोरटा देखील बाहेर आला. त्याने भिंतीवरून उडी मारली. कॉलनीतील इतर लोक आल्यामुळे या आरोपींपैकी एकाने पिस्तुलातून एक गोळी जमिनीवर झाडली आणि दोघांनीही तिथून पळ काढला.
दिवसाढवळ्या या कॉलनीमध्ये अशा पद्धतीने चोरीची घटना उघडकीस आली आहे. या घटनेबाबत पोलीस उपनिरीक्षक शाम शिंदे यांनी तळेगाव दाभाडे पोलिसांना माहिती दिली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.