अहमदनगर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. त्यात आता राष्ट्रवादी अजित पवार गट शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांची महायुती ही निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे आता लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक दावे करत आहेत.
दरम्यान लोकसभा निवडणूक लढवणारच अशी भूमिका आमदार निलेश लंके यांच्या पत्नी आणि माजी जिल्हा परिषद सदस्य राणी लंके यांनी घेतली आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून स्वतः आमदार निलेश लंके यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, ” माझी पत्नी राणी लंके यांनी लोकसभा निवडणूक लढवणारच अशा केलेल्या वक्तव्याबद्दल ध चा मा झाला आहे. प्रत्येक कुटुंबात वेगवेगळे मतप्रवाह असतात. तसा तो आमच्याहीमध्ये आहे. पत्नी राणी लंके यांचे ते वेगळे मत आहे. मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज्ञाधारक कार्यकर्ता आहे. पक्षश्रेष्ठींनी आदेश दिला तर कोणतीही निवडणूक मी लढवू शकतो. मात्र लोकसभेच्या माझ्या उमेदवारी बाबत मला विचारणा नाही झाली… आणि कोणाशी माझी चर्चाही झालेली नाही. ” असे लंके यांनी स्पष्ट केले आहे.