रायगड : रायगड मधील महाडमध्ये बुधवारी रात्री काही मित्र पार्टी करण्यासाठी गेले होते. दारूच्या या पार्टीमध्ये सगळे मजा मस्ती करत असताना अचानक एका मित्राला अस्वस्थ वाटू लागलं आणि त्याने आपलं डोकं टेबलवर ठेवलं, काय झालं हे न समजल्याने बाकीच्या मित्रांनी त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. परंतु त्याला रुग्णालयात आणण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत तरुण हा नडगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संजय देशमुख यांच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये महाड एमआयडीसीतील सुदर्शन केमिकल कंपनीमध्ये काम करत होता. 25 वर्षीय शंभू डीगर हा मूळचा पश्चिम बंगाल येथील राहणारा तरुण अचानक हृदयविकाराच्या झटक्याने गेल्याने त्याच्या सहकाऱ्यांना देखील घडलेल्या प्रसंगावर विश्वास बसत नाही.
खरंतर आतापर्यंत अशा अनेक घटना आपण ऐकल्या असतील. अगदी पहिलवानी करणाऱ्या तरुणापासून दहा वर्षाच्या मुलाला देखील हृदयविकाराच्या झटक्यानं आपले प्राण गमवावे लागले आहेत. डॉक्टरांनी आत्तापर्यंत अनेक कारणे सांगितली आहेत. त्यानुसार सध्याची जीवनशैली हेच प्रमुख कारण यास आहे. रात्रीचे जागरण, वेळी अवेळी जेवण, फास्ट फूड, झोप पूर्ण न होणे, मानसिक त्रास आणि त्याचा अतिविचार अशा प्रमुख कारणांमुळे अगदी लहानांपासून ते तरुण मुलं मुली देखील हृदयाच्या आजारांचे बळी ठरत आहेत. त्यामुळे तरुणांनो सावध व्हा !