पुणे : पिंपरी चिंचवडच्या Pimpri Chinchwad आकुर्डी परिसरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पतीच्या हत्येसाठी Murder पत्नीनेच पाच लाखाची सुपारी दिली होती. परंतु नेमका या हल्लेखोरांचा वार चुकला आणि पती बचावला पोलीस तपासात हा कट पत्नीनेच रचला असल्याचं उघडकीस आलं आहे.
आकुर्डीमध्ये राहणाऱ्या या दाम्पत्याला आठ मुली आहेत. तरी देखील मुलगा व्हावा यासाठी सातत्याने पत्नीचा छळ करत होता. एवढेच नाही तर पती दुसरे लग्न करण्याच्या देखील तयारीत असताना पत्नीने त्याला विष पाजून मारण्याचा प्रयत्न केला. पण नेमका हा प्रयत्न फसला आणि पती बचावला होता.
त्यानंतर तिने घराजवळच राहणाऱ्या शिवम दुबे आणि अमन पुजारी या दोघांना तिच्या पतीला मारण्यासाठी पाच लाखाची सुपारी दिली होती. दरम्यान तिने दोन लाख रुपये रोख देखील दिले होते. शिवम दुबे आणि अमन पुजारी यांनी कट रचून तिच्या पतीला मारण्यासाठी हल्ला चढवला. या हल्ल्यातून देखील तिचा पती बचावला आहे. यानंतर या दांपत्यांच्या मुलीने वडिलांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी निगडी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. यावेळी पोलिसांनी तपास करत असताना धक्कादायक माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी अवघ्या आठ तासात या दोन्हीही गुन्हेगारांना ताब्यात घेतले आणि पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर या दोघांनीही ज्याच्या विरुद्ध सुपारी घेतली होती. त्याच्या पत्नीने सुपारी दिल्याचं कबूल केलं. ही माहिती कुटुंबीयांमधील इतरांना कळाल्यावर सर्वांना धक्का बसला.
वंशाला दिवा मिळावा म्हणून पती तिला शारीरिक आणि मानसिक त्रास देत होता. सातत्याने मारहाण आणि टोमण्यांना वैतागून तिने सुरुवातीला विष पाजून संपवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यातूनही तो बचावला आणि त्यानंतर सुपारी देऊन देखील मोठ्या हल्ल्यातून तिच्या पतीचा काटा काढता आला नाही. याप्रकरणी आता पत्नी आणि दोघा हल्लेखोरांविरुद्ध निगडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.